Torrent Power Project : ठाकरेंसह विरोधकांच्या दणक्यानंतर वन विभागाचा वृक्षतोडीला ब्रेक; ‘टोरंट’ कंपनीचा वनक्षेत्रात वृक्षतोड केल्याचा इन्कार; निवेदन जारी

Torrent Power Responds to Karjat Tree Cutting Row : टोरंट पॉवर कंपनीच्या कर्जत तालुक्यातील साई डोंगर-१ प्रकल्पाला आता राज्यभर विरोध होताना दिसत आहे.
Karjat Torrent Power Project
Karjat Torrent Power ProjectSarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad News : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील टोरंट पॉवर कंपनीच्या साई डोंगर-१ प्रकल्पाला पर्यावरणप्रेमी, स्थानिक ग्रामस्थ आणि विविध राजकीय पक्षांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर जंगलातील वृक्षतोड थांबवण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. तरीही या वृक्षतोडीविरोधातील आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. बुधवारी (ता. २८) मनसे प्रमुख राज ठाकरे कर्जतमध्ये येणार आहेत. तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हेदेखील येथे येऊन पाहणी करणार आहेत.

दरम्यान, टोरंट पॉवर कंपनीचे निवेदन समोर आले असून, कंपनीने वनक्षेत्रात वृक्षतोड केल्याचा इन्कार केला आहे. तसेच हा प्रकल्प स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देणारा असून रोजगाराच्या संधीही निर्माण करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरंट पॉवर कंपनीचा तीन हजार मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. दरम्यान, येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून, ती जवळपास सहा महिने सुरू राहील, असा दावा केला जात आहे. यावरून स्थानिक ग्रामस्थांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष आणि विविध पर्यावरणवादी संघटना या मुद्द्यावर एकत्र आल्या आहेत.

Karjat Torrent Power Project
Torrent Power Project : टोरंट पॉवर प्रकल्पावरून सरकारची कोंडी? भाजपमध्येच मतभेद? मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतरही जेष्ठ नेत्याचा सरकारला घरचा आहेर!

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने याविरोधात आधीच आवाज उठवला आहे. सोमवारी (ता. २६) आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी कर्जतमध्ये जाऊन वृक्षतोडीविरोधात निषेध नोंदवला होता. तर बुधवारी (ता. २८) राज ठाकरे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हेदेखील कर्जतला जाणार आहेत.

त्यामुळे कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळताना दिसत आहे. वन विभागाने येथील वृक्षतोड तात्पुरती थांबवली आहे. मात्र, जंगलाच्या संरक्षणासाठी सुरू झालेला संघर्ष आता राज्यव्यापी आंदोलनाचे स्वरूप घेण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, या प्रकल्पामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रकल्पासाठी हजारो झाडे तोडली जाणार असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर टोरंट पॉवर कंपनीने खुलासा केला आहे. तसेच प्रकल्पाबाबत करण्यात येणाऱ्या आरोपांनाही उत्तर दिले आहे.

कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात टोरंट पॉवर कंपनीकडून उभारण्यात येणाऱ्या तीन हजार मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पातून स्वच्छ ऊर्जा मिळेल. त्याचबरोबर तीन हजार नवीन रोजगार निर्माण होतील, असा दावा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात केला आहे. वनक्षेत्रात आपण वृक्षतोड केलेली नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

या प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या भरपाई वनीकरणाकरिता ६२५ एकर जमीन वन विभागाकडे सोपवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. हा प्रकल्प नदीच्या प्रवाहाबाहेर उभारला जात असून, त्यासाठीच्या जलाशयाकरिता लागणारे क्षेत्रही तुलनेने कमी आहे. प्रकल्पासाठी एकूण ३७७ हेक्टर जमीन लागणार असून, त्यापैकी २३३ हेक्टर जमीन वनक्षेत्रातील असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. साधारणपणे २०७० पर्यंत अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या माध्यमातून ५०० गिगावॉट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

भीमाशंकर अभयारण्यापासून हा प्रकल्प १६ किलोमीटर दूर असून, तो संवेदनशील वनक्षेत्राबाहेर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. अभयारण्यामध्ये वृक्षतोड झालेली नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतरच संबंधित ठिकाणी वृक्षतोड केली जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Karjat Torrent Power Project
Torrent Power Karjat Project : कर्जतमधील वृक्षतोडीवरून हंगामा : CM फडणवीसांनी सुनावलं : "फेक नॅरेटिव्ह थांबवा, 90 हजार नवीन झाडं लावणार!"

हा प्रकल्प भीमाशंकर ज्योतिर्लिंगापासून २० किलोमीटर दूर असून, देवस्थानाजवळ कोणत्याही नव्या प्रकल्पाचा प्रस्ताव नाही, असेही कंपनीने नमूद केले आहे. प्रकल्पासाठी मर्यादित जमिनीचा वापर केला जाणार असून, वनजमिनीचा वापरही मर्यादित असेल. त्यामुळे सह्याद्री वनक्षेत्राला या प्रकल्पापासून कोणताही धोका नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. तर साई डोंगर-१ प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. प्रकल्पस्थळी तसेच अन्य वनक्षेत्रात मिळून कंपनीकडून ९० हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com