Udayanraje Bhosale  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : उदयनराजेंनी अखेरच्या क्षणी सूत्रं फिरवली; चर्चेतील नाव डावलून ज्येष्ठ नगरसेवकाला दिली संधी

Satara Politic's : सातारा उपनगराध्यक्ष निवडीत उदयनराजे भोसले यांनी धक्कातंत्र वापरत मनोज शेंडे यांना बाजूला ठेवून ज्येष्ठ नगरसेवक दत्ता बनकर यांना संधी दिल्याने राजकीय उलथापालथ झाली.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 22 January : सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीत खासदार उदयनराजे भोसले यांनी धक्कातंत्राचा वापर करत शेवटच्या क्षणापर्यंत आघाडीवर असलेले नगरसेवक मनोज शेंडे यांच्याऐवजी ज्येष्ठ नगरसेवक ॲड दत्ता बनकर यांना संधी दिली आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष निवडीच्या तोंडावर मोठी उलथापालथ पहायला मिळाली.

ॲड बनकर यांना संधी देण्यामागे अंतर्गत नाराजी आणि राजकीय गणितेही असल्याचे सांगितले जात आहे. या निवडीमुळे साताऱ्यात (Satara) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले शेंडे यांची संधी मात्र हिरावली गेली आहे. उपगनराध्यक्षपदासाठी डावलण्यात आल्यानंतर कालपर्यंत प्रमुख दावेदार असलेले मनोज शेंडे यांची सभागृहातील अनुपस्थिती हा चर्चेचा मोठा विषय ठरली.

नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी उदयनराजे (Udayanraje Bhosale) कोणाला संधी देतात, याकडे संपूर्ण सातारा शहराचे लक्ष लागले होते. मागील काही दिवसांपासून पालिकेच्या उपाध्यक्षपदासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाकडून नगरसेवक मनोज शेंडे यांचे नाव आघाडीवर होते, मात्र अखेरच्या क्षणी अंतर्गत समीकरणे बदलली.

खासदार उदयनराजे यांनी आज ॲड. बनकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. उपाध्यक्षपद, स्वीकृत सदस्यांच्या निवडी, तसेच विविध विषय समित्यांच्या सदस्यांची संख्या निश्‍चित करण्यासाठी आज पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली.

या सभेपूर्वी खासदार उदयनराजे भोसले हे ॲड. बनकर, नगरसेवक निशांत पाटील, अशोक शेडगे, सुधाकर यादव, सागर पावसे आदींसह पालिकेत आले. उदयनराजेंच्या उपस्थितीत ॲड. बनकर यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे उपाध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल केला. छाननीअंती एकच अर्ज आल्याने सभागृहात पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष मोहिते यांनी ॲड. बनकर यांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी बाक वाजवून ॲड. बनकर यांचे अभिनंदन केले. दरम्यान भाजपकडून पक्षप्रतोद म्हणून नगरसेवक निशांत पाटील, तसेच गटनेता म्हणून नगरसेवक अविनाश कदम यांची वर्णी लागली आहे.

या सभेत स्वीकृत सदस्यपदी रवी पवार, सुनील भंडारी, रीना भणगे, शंकर माळवदे, पंकज चव्हाण यांची नावे जाहीर करण्यात आली. त्यानंतर विविध विषय समित्यांच्या सदस्यांची संख्या निश्‍चित करण्यात आली. यामध्ये विविध विषय समित्यांमध्ये १५ सदस्यांचा समावेश करणे, तसेच दुर्बल घटक विशेष कल्याणकारी समिती याची सदस्य संख्या नऊ निश्‍चित करण्यात आली. या दोन्ही विषयांना सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. सभा संपल्यानंतर नगराध्यक्ष मोहितेंसह अन्य सदस्यांनी ॲड. बनकर यांना त्यांच्या कक्षात सन्मानपूर्वक खुर्चीवर विराजमान केले.

‘कोणी जवळचा अथवा लांबचा नाही’

सर्व नगरसेवक माझेच आहेत. कोणी जवळचा अथवा लांबचा असा कोणी नाही. नगरपालिका नूतन इमारतीच्या उभारणीसाठी जमीन घेण्यापासून पाठपुरावा करण्यापर्यंत घेतलेले परिश्रम आणि ज्येष्ठतेचा विचार करून ॲड दत्ता बनकर यांची निवड केली आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT