Raju Khare -pratap sarnaik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Khare Shivsena Entry : गोगावलेंपाठोपाठ प्रताप सरनाईकांचेही राजू खरेंच्या शिवसेना प्रवेशावर मोठे भाष्य; म्हणाले ‘ऑपरेशन टायगर चालूय...’

Solapur Political News : अनेक आजी-माजी आमदार असतील किंवा आजी, माजी खासदार आमच्या संपर्कात आहेत. ऑपरेशन टायगर होत असेल, तर ऑपरेशन टायगर चालूच राहणार आहे, असे सूचक विधानही प्रताप सरनाईक यांनी केले.

Vijaykumar Dudhale, विश्वभूषण लिमये

Solapur, 12 June : गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार हे पक्षाच्या कार्यक्रमाला न जाता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेत्यांशी संधान बांधत आहेत. त्यामुळे आमदार खरे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगली आहे. पंढरपूरच्या दौऱ्यावर आलेले रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी खरे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत भाष्यही केले आहे. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही त्याबाबत भाष्य केले आहे.

सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार राजू खरे (Raju Khare) यांच्या प्रवेशाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी ‘मी असं कुणाचंही नाव म्हणणार नाही.. राज्यातच नव्हे तर देशानेही एकनाथ शिंदे यांचे कार्यक्षम नेतृत्व हेरलं आहे. ‘पहलगाम हल्ला झाला, तेव्हा एकनाथ शिंदे हे काश्मीरला गेलेले एकमेव व्यक्ती होते.

अनेक आजी-माजी आमदार असतील किंवा आजी, माजी खासदार आमच्या संपर्कात आहेत. ऑपरेशन टायगर होत असेल, तर ऑपरेशन टायगर चालूच राहणार आहे, असे सूचक विधानही प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केले.

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत सरनाईक म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखाचं कौतुक करावं, तेवढं कमीच आहे. अक्कलकोट येथील कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी येणार होतो. मात्र, इतर कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकलो नाही. अक्कलकोटची सभा अकरा तास चालली म्हणजे मी त्यांना म्हटलं ‘गिनीज बुक मध्ये नोंद होण्यासारखी आहे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अक्कलकोटच्या सभेला यायला उशीर झाला. सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावरील प्रेमाखातर कार्यकर्ते शिंदे येऊपर्यंत मंडपात थांबले होते. त्यामुळे त्यांचे कौतुक आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्हाला चांगलं यश मिळेल, याची आम्हाला खात्री आहे.

सुप्रिया सुळेंनी एकच भूमिका ठरवावी

सुप्रिया सुळे यांच्या विधानाबाबतही सरनाईक यांनी भाष्य केले. ते म्हणाले सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेबद्दल कधी कधी प्रश्न निर्माण होतात. त्या कधी मोदींचे कौतुक करतात, कधी मोदींच्या विरोधात बोलतात. त्यांनी एकच भूमिका ठरवावी, त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिरस होणार नाही

मंत्री संजय शिरसाट यांचे जमीन प्रकरण

प्रताप सरनाईक म्हणाले, हल्लीच्या काळात कोणीतरी संजय मीडियाला लागतच असतो. कधी संजय राऊत यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारता, तर आता संजय शिरसाट यांच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारताय. काय परिस्थिती आणि वस्तुस्थिती आहे, हे आम्हाला समजलेलं नाही. या विषयावर मुख्य नेते एकनाथ शिंदे हे संजय शिरसाट यांच्याशी चर्चा करतील आणि त्यावर योग्य ते तोडगाही काढतील.

लक्ष्मण हाकेंना चॅलेंज

प्रा. लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुलाबी जाकेटवाले निधी अडवतात, म्हणून आरोप केला. त्यावर प्रताप सरनाईक यांनी हाकेंना सुनावले. ते म्हणाले, लक्ष्मण हाके यांनी देखील एकदा गुलाबी जॅकेट घालून बघावं. सत्तेचा सहभाग कसा असतो, हे त्यांना देखील समजेल. आम्ही मात्र कोणालाही हाक दिलेली नाही, असेही सरनाईक म्हणाले.

जनता दरबाराचा आव आणू नये

शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांच्या जनता दरबाराबाबत प्रताप सरनाईक म्हणाले, जनता दरबार घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण, जनता दरबार ही कुणाची खसगी मालमत्ता नाही. जनता दरबाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणे वेगळे आणि आव आणणे वेगळं. लोकप्रतिनिधी म्हणून जनता दरबारात आम्ही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जनतेचे प्रश्न सोडवता असतो. महापालिकेच्या निवडणुका आल्यामुळे कुणी जनता दरबाराचे माध्यमातून आव आणू नाही

ठाकरे बंधू एकत्र येणार

ठाकरे बंधू असू द्या; अन्यथा पवार असू द्या. माझे एकच म्हणणं आहे कौटुंबिक जिव्हाळा असेल तर जरूर एकत्र यावे. वीस वर्षांपूर्वी कोणत्या कारणांवरून वेगळी भूमिका घेतली, त्याच भूमिकेतून जर एकत्र येत असतील तर त्यांनी जरूर एकत्र यावं. आम्ही त्यांचं स्वागत करू. मात्र, महायुती भक्कम आहे. या राज्यातून एकत्र आले किंवा विखुरले तरी महायुतीची ताकद आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, एकनाथ शिंदे असलेल्या महायुतीची ताकद मजबूत आहे आणि तो फेविकॉलचा जोड आहे

गोगावलेंच्या मुलाच्या राजकीय एन्ट्रीचे समर्थन

रोहयो मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा राजकारणात प्रवेश करत आहे. मुलांना राजकारणाची आवड असेल, तर त्यांना राजकीय आखाड्यात उतरवणे काही चुकीचे नाही. माझा मुलगा गेल्या अनेक वर्षेपासून युवा सेनेचं काम करतोय. पण, केवळ आमचेच नाही, तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलं देखील राजरकारणात यायला हवीत, अशी अपेक्षा प्रताप सरनाईक यांनी बोलून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT