Solapur, 19 May : सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सेंट्रल इंडस्ट्री या टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीत कारखाना मालकासह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच, संपूर्ण सेंट्रल इंडस्ट्रीज आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्यासह कारखान्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, सोलापूरच्या एमआयडीसी भागातील सर्वच कारखान्यांचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतला आहे.
शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील सेंट्रल इंडस्ट्रीज हा टॉवेल कारखाना रविवारी (ता. 18 मे) आगीत जळून खाक झाला. त्या दुर्दैवी घटनेत टॉवेल कारखान्याच्या मालकासह त्यांचा नातू, नातसून, पणतू आणि चार कामगारांचा अंत झाला. त्यामुळे सोलापुरातून (Solapur) हळहळ व्यक्त होत आहे. त्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने बैठक बोलावली आहे.
सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्यात झालेल्या अग्नितांडवनंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उद्या (ता. 20 मे) जिल्हा प्रशासनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. एमआयडीसी (MIDC) भागात वारंवार आगीच्या घटना का घडतात, याची उपाययोजना आणि सेंट्रल इंडस्ट्रीची आगीच्या घटनेसंदर्भात सविस्तर चर्चेसाठी ही बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली आहे.
दरम्यान, सोलापूरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, एमआयडीसीचे अधिकारी, अग्निशमन दल प्रमुख, महावितरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या सह अन्य काही निमंत्रित लोकांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. सेंट्रल इंडस्ट्रीला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती करायची का? याचा निर्णयही उद्याच्या बैठकीत होणार आहे.
अक्कलकोट रोड एमआयडीसीतील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या एमआयडीसी भागातील सर्व कारखान्यांचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिक ऑडिट केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीच्या विकासासाठी 40 कोटींचा प्रस्ताव मागील वर्षी उद्योग विभागाकडे पाठवला आहे. मात्र, अद्याप हा प्रस्ताव मंजूर झालेला नाही. उद्याच्या बैठकीत या संदर्भात चर्चा केली जाईल, असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.