
Ajit Pawar News : बारामती तालुक्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्वाची असलेली माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी गटाने, विरोधी भाजप गटाने आणि कष्टकरी शेतकरी समितीने संभाव्य उमेदवारांच्या नावांसाठी चाचपणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
'माळेगाव' कारखाना निवडणुकीसाठी 21 मे पासून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरु होत आहे. 27 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 22 जून रोजी मतदान होणार आहे. या प्रक्रियेचा कालावधी अत्यंत जवळ आल्याने सर्वच नेते मंडळी, इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते वेगाने निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. तुल्यबल लढतींसाठी उमेदवारांच्या नावांची चाचपणी करण्यासाठी गावोगावी संबंधित पदाधिकाऱ्यांचा गुप्त बैठकांचा धडाका सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, ज्येष्ठ नेते बाळासाहेब तावरे, संचालक मदनराव देवकाते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर यांचा समावेश आहे. विरोधी गटातील भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी काही संभाव्य उमेदवारांनीही पॅनेलची तयारी केली असल्याची माहिती आहे. या गुरु-शिष्यांची सभासदांबरोबर उठ-बस वाढली आहे.
याशिवाय कष्टकरी समितीनेही ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे. त्या दृष्टीने आमचीही तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीप्रमाणे माजी पदाधिकारी व इच्छुक आहेत. पण या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी काही दिवसांपूर्वी सभासदांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पॅनेल टाकणार असल्याचे संकेत दिले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, माळेगावमध्ये सत्ताधारी व विरोधकांच्या एकत्रिकरणाच्या फॉर्मुल्यावर चर्चा सुरू आहे. सत्ताधारी गटाचे नेते अजित पवार आणि विरोधी गटाचे प्रमुख चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्यात एकत्रीकरणाचा फॉर्मुला पुढे आल्यास आपल्या नावाला पसंती मिळेल का? संभाव्य उमेदवारांच्या यादीमधून आपला पत्ता कट झाल्यास कोणता मार्ग स्वीकारायचा, या विवंचनेत काही आजी-माजी पदाधिकारी इच्छुक आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.