
Solapur, 19 May : विधानसभा निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींमुळे माजी आमदार दिलीप माने हे काँग्रेस पक्षापासून दुरावले होते. पक्षाचे नेते आणि कार्यक्रमांपासून माने हे चार हात दूर होते. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ता काबीज केल्यानंतर एका कार्यक्रमात माने यांनी ‘मी काँग्रेसमध्ये आहे. मात्र, काँग्रेसवाले मला आपला मानतात का,’ असा सवाल केल्यानंतर तातडीने सूत्रे हलली. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने सुमित्रा निवासस्थान गाठले आणि माने यांचा बाजार समितीतील विजयाबद्दल सत्कार केला.
लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना निर्णायक आघाडी मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणारे माजी आमदार दिलीप माने हे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छूक होते. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यास काही दिवसांचाच कालावधी शिल्लक राहिलेला असतानाही माने यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होत नव्हती.
महाविकास आघाडीत शिवसेनेकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली होती. काँग्रेसकडून सर्वाधिक प्रबळ दावेदार असूनही उमेदवार मिळत नसल्याने दिलीप माने (Dilip Mane) समर्थकांचा संयम संपत चालला होता, त्यामुळे मानेंनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यात दक्षिण सोलापूरसह दहा ठिकाणी उमेदवार उभे करण्याचे आव्हान देण्यात आले. त्यानंतर प्रणिती शिंदे यांनी हायकमांडशी चर्चा करून मानेंची उमेदवारी जाहीर करण्यात यश मिळविले.
काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली खरी पण उमदेवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वेळ संपत आला तरी एबी फार्म काय पक्षाकडून मिळाला नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या मानेंनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. तसेच, निवडणुकीतून माघार घेण्याचाही निर्णय घेतला. दक्षिणच्या आमदारकीचे प्रबळ दावेदार असलेल्या माने यांच्यावर निवडणुकीतून माघार घेण्याची नामुष्की ओढावली होती, त्यामुळे शिंदे यांच्यासह काँग्रेस नेत्यांचा माने समर्थकांनी कडक शब्दांत समाचार घेतला होता.
काँग्रेस पक्ष आणि नेत्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळूनही दिलीप माने यांनी पुढची पाऊले संयमाने टाकली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकसाठीची निर्णायक मते माने यांच्याकडे होती. माने यांना सोबत घेतल्याशिवाय दोन्ही तालुक्यांतील कोणत्याही नेत्याला बाजार समिती जिंकणे अशक्यप्राय होते, हे लक्षात घेऊनच भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे आणि राजशेखर शिवदारे यांना एकत्र आणून पॅनेल उभे केले. या पॅनेलने बाजार समितीवर वर्चस्व मिळविले.
भाजपकडून बाजार समितीवर काँग्रेसचा सभापती झाला, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. शिवाय दोन्ही देशमुखांनी या युतीला मान्यता दिली नव्हती, त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखाली बाजार समितीत काँग्रेसचा सभापती झाला, अशी चर्चा होती. याशिवाय दिलीप माने यांनी एका कार्यालयाला दिलेल्या भेटीत ‘मी काँग्रेसमध्येच आहे. मात्र, काँग्रेसवाले मला आपला मानतात का?,’ असा सवाल केला होता.
मानेंच्या त्या विधानानंतर सूत्रे हलली आणि सोलापुरात आलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलीप माने यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. या भेटीनंतर माने पुन्हा काँग्रेस पक्षात स्थिरावणार की सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार ते नवा पर्याय धुंडाळणार, हे आगामी काळातच दिसून येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.