सूर्यकांत नेटके
Ahmednagar : सहा महिन्यापासून धावपळ, आऱोप-प्रत्योरोप, नेत्यांच्या उड्या सुरू होत्या. निवडणुकीत गतवेळीचे सहकारी यावेळी समोरासमोर आले. युत्या-आघाड्या करुन चार पॅनलचे 84 उमेदवार रिंगणात आले. प्रचाराच्या काळात बरीच उधळपट्टी झाली, पेपरातून आरोप-प्रत्यारोप झाले. आता आज (रविवारी ) नेमकं मत देण्याची वेळ आलीय, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या ( Ahmednagar District Primary Teachers Cooperative Bank ) निवडणुकीत आता गुरुजी कोणाला सत्ता देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा सहकारी बॅंकेनंतर शिक्षक सहकारी बॅंकेकडे पाहिले जाते. हजारो कोटीची उलाढाल असलेल्या शिक्षक सहकारी बॅंकेत साधारण अकरा हजाराच्या जवळपास मतदार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख बॅंक असल्याने तेथे कारभारी होण्याची संधी मिळण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरु असते. थेट राजकीय लोकांचा यात सहभाग नसला तरी आपल्या वतीचे नेते बॅंकेत कारभारी असावेत अशी राजकीय नेत्यांची इच्छा असते आणि त्यादृष्टीने पडद्या मागून करता येईल तेवढी मदत नेते करत असतात. शिक्षकांतही नेत्यांची संख्या मोठी आहे.
मागील पंचवार्षिक निडणुकीत ज्येष्ठ नेते रावसाहेब रोहोकले व बापू तांबे यांच्या गुरुमाऊली मंडळाने सर्व जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली. रोहोकले गुरुजी अध्यक्ष झाले. मात्र नंतरच्या काळात तांबे व रोहोकले गुरुजी यांच्या वितुष्ट आल्याने गुरुमाऊली मंडळाचे दोन गट पडले. तांबे गटाने बॅंकेवर ताबा मिळवला. आता या निवडणुकीत रोहोकले गुरुजी व बापू तांबे असे गुरुमाऊली मंडळाचे दोन गट समोरासमोर उभे आहेत. शिवाय गुरुकुल मंडळाचे नेते डॉ. संजय कळमकर यांचा स्वराज्य मंडळाशी झालेल्या युतीतून एक पॅनल आहे.
ज्येष्ठ नेते राजू शिंदे यांच्या सदिच्छा मंडळाने इब्टाशी युती करुन पॅनल उभा केला आहे. त्यामुळे बॅंकेच्या निवडणुकीत चार पॅनलमधून 84 उमेदवार रिंगणात आहेत. खरं तर बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कालावधी संपला. मात्र कोरोना व अन्य कारणाने सतत बॅंकेची निवडणूक पुढे ढकलत गेली. आता अखेर प्रत्यक्ष मतदान कऱण्याची वेळ आलीय. बँकेतील गैरव्यवहार व अन्य कारणाने सतत शिक्षक नेत्यांनी एकमेकांवर सतत टीका, आरोप-प्रत्यारोप केले.
प्रचाराच्या काळात अनेक नेते, कार्यकत्यानी आपापल्या सोयीने इकडून- तिकडे उड्या मारल्या. संघटना बदलली की आपल्या पुर्वीच्या संघटनेवर आरोप करणे हे सुरुच होते. चहापेक्षा किटली गरम असे म्हणतात, तसेच बॅंकेत चहासाठी खर्च केलेल्या पैशावरुनही आरोप-प्रत्यारोप सुरु होते. त्यामुळे नगर जिह्यात गुरुजीचे राजकारण चांगलेच तापले होते. प्रचार काळात मोठी पैशाची उधळपट्टी केली. आता खर्च केलेले पैसे कारणी लागवेत म्हणून शिक्षक नेते लक्ष ठेवून आहेत. पॅनल असले तरी काही ‘गुरुजी’ आपल्या सोयीने ‘क्रॉस’ मते करतात, हा आतापर्यतचा अनुभव पाहून ‘क्रॉस’ ओटींग होणार नाही यासाठी नेते आणि कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत. आज (रविवारी) नेमकं मत देण्याची वेळ आलीय, जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत आता नेमकी गुरुजी कोणाला सत्ता देणार याकडे अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ऑनलाईन संघटन
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आज (रविवारी) मतदान होत आहे. विविध संघटनांनी आपापल्या सोयीने पाठिंबा दिला आहे. आपले संघटन आणि संघटनेची ताकद दाखवण्याची भाषा नेते व्यक्त करत आहेत. त्यासाठी काल (शनिवारी) ऑनलाईन बैठका घेऊन ‘जे ठरलं ते करायचं’ यावर शिक्का मोर्तब झाले. शिक्षक भारती चे नेते दिनेश खोसे यांनी बैठक घेऊन ठरल्याप्रमाणे मत द्यायचे सांगितले. मात्र नेमके कोणाला मते देणार हे पेट्या फुटल्यावरच कळेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.