ajit Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar : कोल्हापुरात शिक्षण घेतलेल्या अजितदादांचं आणखी एक स्वप्न राहिलं अधुरं, स्नेहमेळाव्याची सुरु होती तयारी...

Ajit Pawar Kolhapur education : 'अजित दादांचे दोन वर्षाचे शिक्षण हे कोल्हापुरातील शहाजी कॉलेज येथे झाले. पूर्वी हे कॉलेज शालिनी पॅलेस या ठिकाणी होते. दैनंदिन कामासोबत आपल्या जुन्या मित्रांना भेटण्याचा त्यांचा मानस होता. त्यामुळे कॉलेजकडून आणि माजी विद्यार्थ्यांकडून स्नेह मेळाव्याची तयारी सुरु होती.'

Rahul Gadkar

Kolhapur News, 29 Jan : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. हे वृत कळताच संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. कोल्हापुरात देखील त्यांच्या मित्रांनी जुन्या आठवणी ताज्या करत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

दादांचे दोन वर्षाचे शिक्षण हे कोल्हापुरातील शहाजी कॉलेज येथे झाले. पूर्वी हे कॉलेज शालिनी पॅलेस या ठिकाणी होते. दैनंदिन कामासोबत आपल्या जुन्या मित्रांना भेटण्याचा त्यांचा मानस होता. त्यामुळे कॉलेजकडून आणि माजी विद्यार्थ्यांकडून स्नेह मेळाव्याची तयारी सुरु होती. अखेर ते स्वप्न देखील अपूर्ण राहिलं.

महाविद्यालयाच्या अनेक मित्रांना एकत्रित करून स्नेहमेळावा कोल्हापुरात घ्यायचा होता. तसे त्यांनी दादांशी बोलून मेळाव्याची तारीखही घेतो, असा पुढाकारही घेतला होता. मागील महिन्यात अजितदादांनी स्वीय सहायकांकरवी महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे शैक्षणिक नोंद मागवली होती. अशीही आठवण या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी सांगितली.

अजितदादांचे बारावीनंतरचे शिक्षण कोल्हापुरातील तत्कालीन शालिनी पॅलेस येथील शहाजी छत्रपती महाविद्यालयाशी जोडले गेले. त्यांनी १९७८-७९ मध्ये वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षासाठी येथे बहिस्थ विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला होता. त्यामुळे त्यांची नाळ कोल्हापूरच्या मातीशी घट्ट जुळलेली होती.

अजितदादांचे काका ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे ते अधिक दृढ झाले. त्यातच बहीण विजया यांचा विवाह झाल्यानंतर त्या कोल्हापुरात वास्तव्यास आल्या. त्यामुळे त्यांचा जिव्हाळा अधिक वाढला. याच पार्श्वभूमीवर त्यांनी शहाजी छत्रपती महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षासाठी बहिस्थ विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला.

त्यांचा नोंदणी क्रमांक १२८ होता. या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी त्यांनी स्थानिक रहिवास म्हणून ताराबाई पार्कातील जयदीपराव भोसले यांच्याकडे वास्तव्यास असल्याचे दाखवले होते. त्यांना काहीकाळ तत्कालीन प्राचार्य डॉ. आबासाहेब शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, ते न्यू कॉलेजमधील मित्रांसोबत शिवाजी पेठेतील मित्रांकडे जेवणास जात असत.

त्यांच्या या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. बुधवारी त्यांच्या विमान अपघाताचे वृत्त समजताच शोककळा पसरली. स्नेहमेळाव्याचे स्वप्न अधुरे राहिले शहाजी महाविद्यालयात अजितदादांच्या एक वर्ष अगोदर भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर मुळे हेही याच १९७६-७७ चे महाविद्यालयात शिकत होते. त्यांच्यानंतर १९७८-७९ दरम्यान अजितदादा आणि त्यानंतरच्या काळात राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हेही याच महाविद्यालयात शिकत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT