- उमेश भांबरे
Ajit Pawar Speech Today : राज्याचे उपमुख्यमंत्री आज मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यानिमित्त साताऱ्यात आले होते. यावेळी साताऱ्यातील विकासकामांचा निधी रखडत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावेळी त्यांनी आपला ताफा सातारा शासकीय विश्रामगृहाकडे वळविला आणि तेथे अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या विकासकामांच्याबाबतीत आढावा घेतला. (Ajit Pawar Speech Today)
यावेळी अजित पवार शासकीय विश्रामगृहात आल्यानंतर ते कक्षात अधिकाऱ्यांशी चर्चा करीत बसले होते. त्यावेळी त्यांनी आल्या आल्या पिण्यासाठी तेथील कर्मचाऱ्याकडे पाण्याची मागणी केली. पण उपमुख्यमंत्री आल्याच्या धांदलीत तो कर्मचारी पाणी देण्यास विसरला. तसेच त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनाही बराच वेळ पाणी न मिळाल्याने त्यांनी याबाबत अजितदादांकडे तक्रार केली, त्यावरुन अजितदादा संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांकडे त्या कर्मचाऱ्याची तक्रार करीत 'तो मला परत इथे दिसता कामा नये आणि दिसला तर तुम्ही दिसणार नाही,' असा सज्जड दम भरला.
जिल्ह्यात सुरू असलेले मेडिकल कॉलेज, नूतन शासकीय विश्रामगृह व सैनिक स्कूलचे नूतनीकरण आदी कामे निधीअभावी थांबू नयेत. पुरेसा निधी वेळेत उपलब्ध होत नसेल तर अधिकाऱ्यांनी तातडीने संपर्क करून याबाबतची माहिती देण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बांधकामच्या अधिकाऱ्यांना केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नसमारंभासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात विविध विकासकामांसाठी निधी वेळेत उपलब्ध होतोय का, याचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, नितीन भरगुडे-पाटील, बाळासाहेब सोळसकर, अमित कदम, तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी साताऱ्याच्या दौऱ्याविषयी अजित पवार यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, मी शंभूराज देसाईंच्या मुलाच्या लग्नसमारंभासाठी आलो होतो. यावेळी साताऱ्यातील काही विकासकामांना निधीची काही अडचण आहे का, याची माहिती घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहात थांबून अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली.
सातारा मेडिकल कॉलेजचे काम निधीअभावी थांबले आहे. ते कोणामुळे थांबलंय वित्त विभागामुळे की वैद्यकीय शिक्षण विभागामुळे यांची माहिती घेतली. तसेच बांधकाम विभागाचीही कामे सुरू आहेत, यामध्ये सैनिक स्कूलचे काम तसेच शासकीय विश्रामगृहाचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील कोणतीच कामे निधीअभावी थांबू नयेत, याची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या आहेत.
नाना अजितदादांच्या प्रेमात...
अजित पवार शासकीय विश्रामगृहात आल्यानंतर त्यांच्याकडे कराडचे भाजपचे नेते व माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) येऊन बसले. दोन्ही नेत्यांत तासभर बंद दाराआड चर्चा सुरू होती. पवार व पाटील यांच्यातील या चर्चेमुळे नाना आगामी काळात काही निर्णय घेणार नाहीत ना, याची उत्सुकता विश्रामगृहात होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.