Ajit Pawar and Amit Shah Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha election 2024 : साताऱ्याच्या जागेवरून अजित पवार अमित शाह यांना 'शह' देणार?

Satara Lok Sabha Constituency : महायुतीत साताऱ्याच्या जागेवरून राष्ट्रवादी व भाजपमध्ये संघर्ष होण्याची चिन्हं!

उमेश भांबरे :सरकारनामा

Ajit Pawar and Amit Shah News : केंद्रीय गृहमंत्री व महायुतीची प्रमुख नेते अर्थात अमित शाह यांनी उदयनराजे यांना भेटीची वेळ देऊन त्यांना सातारा लोकसभेच्या तिकिटाची गॅरंटी दिली. त्यानंतर आता उदयनराजे कामाला लागतील आणि लढतील असे संकेत बांधले जात असतानाच दुसरीकडे अमित शाह यांच्या शब्दापलीकडे न जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आता थेट अमित शाह यांना 'शह' देण्याचा प्रयत्न चालवल्याचे दिसत आहे.

साताऱ्याच्या जागेवरून आम्ही मागे हटणार नाही, ही जागा राष्ट्रवादीचीच आहे, असा दावा ठोकून एकप्रकारे अमित शाह यांनी दिलेल्या गॅरंटीला अजित पवार धक्का देण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजेंऐवजी तेथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील उभे राहतात की काय, हे पाहावे लागणार आहे.

सातारा लोकसभेबाबत महायुतीत भाजप व अजित पवार(Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. महायुतीत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी शिरूरच्या मेळाव्यात सातारा, बारामती, रायगड आणि शिरूर या मतदारसंघावर दावा केला होता. या जागा त्यांची राष्ट्रवादी लढेल असे स्पष्ट केले होते. पण, साताऱ्याच्या जागेचा तिढा वाढेल असे वाटत नसताना ऐनवेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातूनच भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याचा हट्ट धरला.

मात्र, जागा वाटपाच्या चर्चेत साताऱ्याची जागा अजित पवार यांना जाणार हे निश्चित झाले. त्यामुळे उदयनराजे समर्थक आक्रमक झाले त्यांनी भाजपच्या पदाधिकारी व मंत्र्यांना जिल्हयात फिरून न देण्याचा इशारा दिल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतर उदयनराजे यांच्यापुढे राष्ट्रवादीतून लढण्याचा पर्याय देवेंद्र फडणवीस यांनी ठेवला. पण उदयनराजेंनी तो नाकारत थेट दिल्ली गाठली व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी इथे तीन दिवस तळ ठोकून राहिले. शेवटी शनिवारी रात्री अमित शाह(Amit Shah) यांनी त्यांना भेट देऊन त्यांना साताऱ्यातून भाजपची भाजपची उमेदवारी देण्याची गॅरंटी दिली.

त्यामुळे आता खासदार उदयनराजे भोसले मतदारसंघात येऊन कामाला लागतील व निवडणूक लढण्याची तयारी सुरू करतील असे वाटत होते. पण तिकडे अजित पवार गटाने आक्रमक होत सातारची जागा ही राष्ट्रवादीचीच आहे त्यावर राष्ट्रवादीचा हक्क असून आम्ही ही जागा आम्ही सोडणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

याबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची रविवारी बैठक झाली. यामध्ये राष्ट्रवादी महायुतीत सात जागांसाठी आग्रही असल्याचे सांगण्यात आले. तसेच साताऱ्याची जागाही आम्ही सोडणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली.

येत्या दोन दिवसात महायुतीची यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आक्रमक होत आता अमित शाह यांनी उदयनराजे यांना दिलेल्या गॅरेंटीला डावलून स्वतःचा उमेदवार देण्याची तयारी केली आहे. यामुळे महायुतीत साताऱ्याच्या जागेवरून राष्ट्रवादी व भाजपमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

अजित पवारांचा आग्रह का...? -

सातारा लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यापासून आग्रही आहेत. कारण साताऱ्यात सध्या राष्ट्रवादीचाच विद्यमान खासदार आहे. त्यामुळे महायुतीतील जागा वाटपाच्या सूत्रानुसार ज्यांचा विद्यमान खासदार त्यांना तो मतदारसंघ सोडण्यास प्राधान्य, अशी सर्वसामान्य भूमिका आहे.

तसेच सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यावर आपलेच प्रभुत्व रहावे यासाठी अजित पवार प्रयत्नशील आहेत व त्यातूनच ते साताऱ्यासाठी आग्रही आहेत. तसेच साताऱ्यात खासदार शरद पवारांचा ही करिष्मा चालतो. पण अजित दादांचा खासदार निवडून आला, तर हा शरद पवारांनाही 'शह' मानला जाईल, यातूनच अजितदादांचे हे मनसुबे आहेत.

नितीन पाटील सातारा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक -

2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून लक्ष्मणराव पाटील यांचे सुपुत्र नितीन पाटील हे सातारा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत त्यांनी खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांच्याकडे ही मागणी केली होती. मात्र पवारांनी त्यांना शब्द दिला नाही, पण आता राष्ट्रवादीत दुफळी झाल्यानंतर नितीन पाटील व बंधू आमदार मकरंद पाटील हे अजित पवार गटात गेले. त्यामुळे आता या वेळेस अजित दादांच्या माध्यमातून ते साताऱ्यातून खासदार होणे सोपे असल्याने आता ते इच्छुक आहेत.

नितीन पाटील हे वाई, खंडाळा, महाबळेश्वर या मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू असून ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. तसेच नुकतेच त्यांनी किसन वीर कारखाना व खंडाळा कारखाना निवडणूक जिंकली आहे. त्यांची ताकत वाढली असल्याने ते महायुतीकडून सातारा लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT