Ajit Pawar-Dilip Mane-Anand Chandanshive Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajitdada Solapur Tour : अजितदादांनी दिला भाजपच्या दोन देशमुखांच्या मतदारसंघातील मोठ्या नेत्यांना वेळ...

Vijaykumar Dudhale

Solapur News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शनिवारी (ता. ३ फेब्रुवारी) सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अजितदादा हे प्रथमच सोलापुरात येत आहेत, त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात पवार हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असलेले दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांची तिऱ्हे येथे भेटणार घेणार आहेत. तसेच, तळ्यात-मळ्यात असलेले माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासाठी दादांनी राखीव वेळ दिला आहे. (Ajit Pawar will meet Dilip Mane, Anand Chandanshive during his visit to Solapur)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बहुचर्चित दौरा अखेर जाहीर झाला आहे. त्यानुसार ते उद्या सकाळी साडेनऊच्या सुमारास लातूरहून हेलिकॉप्टरने सोलापूरला येणार आहेत. श्री सिद्धरामेश्वराच्या दर्शनाने अजित पवार आपल्या सोलापूर दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. त्यानंतर ते सोलापूर जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार आहेत. त्यानंतर ते किसन जाधव यांनी आयोजित केलेल्या शिबिराचे उद्‌घाटन आणि विकास कामांचे भूमिपूजन करणार आहेत. दीड ते सव्वा दोनपर्यंत ते जाधव यांच्याकडे असणार आहेत. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील पंधरवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोलापूर दौरा झाला होता. त्यानंतर उद्या अजितदादा सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांनी दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांना भेटीसाठी दिली आहे. माने यांना वेळ देऊन पवार यांनी एकाच वेळी महाविकास आघाडी आणि भाजपलाही सूचक इशारा दिल्याचे मानले जाते. यामध्ये भविष्याचे बेरजेचे राजकारण दिसत आहे.

माने यांनी विधानसभेसाठी काँग्रेसबरोबर पुन्हा जुळवून घेण्याचे संकेत दिले होते, त्यातूनच ते प्रकाश वानकर यांच्या फार्म हाऊसवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर गेले होते. मात्र, त्याच मानेंना राखीव वेळ देत एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

सोलापूरच्या ग्रामीण भागात बळकट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शहरातही बळकट करण्याच्या उद्देशाने अजित पवार यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुंबईत जाऊन भेटणारे माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनाही अजितदादांनी राखीव वेळ दिला आहे. त्यामुळे चंदनशिवेंसारखा जनतेतील नेत्याला आपल्या गोटात ओढून पवार यांनी विधानसभेचीही गोळाबेरीज चालवल्याचे मानले जात आहे.

आनंद चंदनशिवे हे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील महत्वाचे नेते आहेत, तर दिलीप माने यांनी तर थेट माजी सहकार मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांना आव्हान देण्याची भाषा केली आहे, त्यामुळे भाजप आमदारांच्या मतदारसंघातील दोन महत्वाच्या नेत्यांना अजितदादांनी वेळ देत महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनाही संदेश दिल्याचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT