Solapur, 27 May : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. संघटना बळकटीकरणासाठी पक्षपातळीवर घडामोडी घडत आहेत. महायुतीमधील मोठा भाऊ असलेल्या भाजपने शहर आणि जिल्हाध्यक्षपदांची नियुक्ती करत एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीपासून अद्यापपर्यंत सोलापूरचा जिल्हाध्यक्ष नेमता आलेला नाही. एकीकडे पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचे पालकत्व स्वीकारले असूनही त्यांनी अजूनही संघटनात्मक दृष्टीने सोलापूरचा दौरा केलेला नाही. पक्षाकडे दिग्गजांचा भरणा असूनही राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कॅप्टनविना राष्ट्रवादीची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) राजीनामा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी सांगोल्यातून विधानसभा निवडणूकही लढवली, त्यावेळी साळुंखे दिलेल्या राजीनाम्यापासून पक्षाला अजूनही सक्षम असा चेहरा मिळू शकलेला नाही, असे दिसून येते. एकेकाळी वैभव अनुभवलेल्या, सर्वाधिक शक्तीशाली राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्ष मिळत नसल्याची सद्यस्थिती आहे.
वास्तविक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सोलापूर (Solapur) जिल्ह्यात अनेक मातब्बर नेते असतानाही त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे सोपवावीत, असे अजितदादांना का वाटत नाही, असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही पक्ष संघटना मजबूत करावी, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची दिसून येत नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार संजय शिंदे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे चंद्रभागा कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, उमेश पाटील, दादासाहेब साठे, असे एकापेक्षा एक सरस नेते आहेत. यातील काहींनी जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. पण, विधानसभा निवडणुकीनंतर यातील एकाही नेत्याकडे पक्षाची धुरा सोपवावी, असा निर्णय का होऊ शकलेला नाही, असा प्रश्न आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत गेलेले दीपक साळुंखे परत पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. आपल्याला पुन्हा पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची कमान मिळावी, अशी अपेक्षाही त्यांची आहे, त्या दृष्टीने त्यांनी काही नेत्यांच्या माध्यमातून अजितदादांकडे फिल्डिंग लावल्याचीही माहिती आहे. मात्र, अजितदादा त्यांच्यासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीवेळी पक्षापासून दुरावलेले उमेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासोबत जोडून घेत पक्षात प्रवेश केला आहे, त्यांचेही नाव जिल्हाध्यक्षपदासाठी घेतले जाते. मात्र, मोहोळ तालुक्यातील त्यांचे प्रतिस्पर्धी राजन पाटील यांची सहमती मिळणे अशक्य आहे, त्यामुळे उमेश पाटील यांचे नाव स्पर्धेतून बाजूला होऊ शकते.
माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांचे पती दादासाहेब साठे यांनीही जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छा दर्शविली आहे. तसेच, कल्याणराव काळे, राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र, यातील नावावर एकमत होणे अवघड दिसत आहे. त्यामुळे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या गळ्यात जिल्हराध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, नव्या जिल्हाध्यक्षांना पक्षासाठी पूर्णवेळ द्यावा लागणार आहे.
अजितदादांनाही वेळ मिळेना
बारामतीच्या शेजारी असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे राजकीय पालकत्व खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारले आहे. मात्र, अजित पवार यांचा सोलापूरला संघटनात्मक पातळीवरचा दौरा अजूनही झालेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्या पार्श्वभूमीवर कोणत्याही हालचाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिसत नाहीत, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.