Ajit Pawar News : अजित पवार अंबाजोगाईतच, पण शिवराज दिवटेची भेट न घेताच निघून गेले! मराठा संघटनांकडून निषेध!
Beed Political News : तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू, अशी धमकी देत शुक्रवारी परळीत दहा ते बारा जणांच्या टोळक्याने शिवराज दिवटे या तरुणाला बेदम मारहाण केली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या शिवराज याच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीत बैठकीसाठी आलेल्या अजित पवारांनी शेजारीच असलेल्या रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटे यांची भेट न घेताच ते पुढील दौऱ्याला रवाना झाले. अजित पवार हे कोत्या मनाचे आहेत, असा आरोप मराठा संघटनांनी करत त्यांचा निषेध केला.
अजित पवार (Ajit Pawar) हे कडक शिस्त आणि वेळ पाळणारे नेते म्हणून राज्यभरात ओळखले जातात. आजच्या त्यांच्या बीड दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम असल्याने प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोचण्यासाठी त्यांनी काही नियोजित कार्यक्रमही टाळले. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय महाविद्यालयातील बाह्य विभाग तसेच मुलांच्या वस्तीगृहाच्या नूतन इमारतीची पाहणी, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय बी-बिल्डींग सर्जिकल वार्ड आणि नूतन मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते होणार होते.
परंतु पुढील कार्यक्रम आणि बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उशीर नको, म्हणून ते लोकार्पण न करताच अंबाजोगाई येथून पुढील ठिकाणी निघून गेले. (Beed News) परळीत हल्ला झालेल्या शिवराज दिवटे याच्यावर शेजारच्याच इमारतीत उपचार सुरू असल्यामुळे अजित पवार त्याची भेट घेऊन दिलासा देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. दोन दिवसापासून बीड जिल्ह्यातील आमदार धनंजय मुंडे, सुरेश धस,खासदार बजरंग सोनवणे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शिवराज दिवटे याची भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची चौकशी केली होती.
अजित पवार हे नियोजित कार्यक्रमासाठी अंबाजागोईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात येणार असल्यामुळे ते देखील शिवराज दिवटेची भेट घेतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. या अपहरण आणि मारहाण प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक वातावरण पुन्हा तापले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार दिवटे याच्या भेटीला जाऊन आरोपींना कठोर शिक्षेचे आश्वासन देत दिलासा देतील, अशी अपेक्षा मराठा समन्वयक आणि संघटनांना होती. मात्र अजित पवारांच्या नियोजनात ही भेट नसल्याने ते अंबाजोगाईतून थेट पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले.
त्यामुळे मराठा संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अजित पवार हे कोत्या मनाचे असल्याची टीका केली. अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि बारामतीचा विकासाचा विषय आल्यानंतर अजित पवार सक्रिय होतात तर बीडच्या विकासावर मात्र दादा संवेदनाहीन होतात. दादा अत्यंत कोत्या मनाचे आहेत, त्यामुळे शिवराज दिवटे या तरुणाला भेटण्यास गेले नाही. म्हणून आम्ही अजित पवार यांचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.