Akole
Akole Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Akole : राष्ट्रवादीच्या नेत्यांची चालत्या वाहनात विखे पाटलांशी 'गूफ्तगू' ; अकोलेत नेमकं चाललंय काय?

सरकारनामा ब्यूरो

अकोले : भाजपचे नेते व माजी मंत्री मधुकर पिचड हे कधीकाळी राष्ट्रवादीत असताना त्यांच्या अत्यंत विश्वासू वलयातील समजल्या जाणार्‍या तिघांसह अन्य एक असे अकोले तालुक्यातील चौघा दिग्गज नेत्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांच्याशी चक्क चालत्या वाहनात ‘गुफ्तगू’ केल्याची माहिती समोर आल्याने, जिल्ह्यातील राजकीय तर्क-विर्तकांना उधाण आले आहे.

या चौघांची ‘ती’ भेट अकोल्यातील बदलत्या राजकारणाचे चित्र आहे की, अन्य काही याबाबत स्पष्टता नसली तरीही त्यातून वेगवेगळ्या राजकीय कड्या जोडल्या जावू लागल्या आहेत. मंत्री विखेंची भेट घेणार्‍यांमध्ये माजी मंत्री पिचडांच्या नेहमीच विरोधात असलेल्या नेत्याचाही समावेश असल्याने या भेटीमागील गूढ मात्र अनेकांच्या झोप उडवणारे ठरले आहे.

आदिवासी बहुल असलेल्या अकोले विधानसभा मतदारसंघाने 2019 सालच्या निवडणुकीत परिवर्तन घडवताना राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या आमदार वैभव पिचड यांना पराभवाची धूळ चारली. याच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भरगच्च सभा झाल्या.

यावेळी एका सभेत माजी उपमुख्यमंत्र्यांनी अकोल्यातील बहुजनांचे नेते मानल्या जाणार्‍या सीताराम गायकर यांच्यावर अतिशय शेलक्या भाषेत टीका करताना त्यांचे धोतर फेडण्याचेही भाष्य केले होते. त्यातून पवार आणि गायकरांचे परस्पर संबंध ताणले गेल्याचे बोलले जात असतानाच खुद्द अजित पवार यांच्याच शिष्टाईने पिचडांसोबत भाजपवासी झालेल्या गायकरांसह कैलास वाकचौरे यांनीही हातात घड्याळ बांधले.

चार दशके अकोल्याचे सत्ताकेंद्र असलेल्या पिचड पिता-पुत्रांची सत्ता खालसा झाल्यानंतर राष्ट्रवादीने राज्यातील सत्तेचा वापर करुन आपल्या पक्षाची पाळेमुळे रुजवण्यासाठी अकोल्यात मोठी शर्थ केल्याचेही नंतरच्या काळात दिसून आले. त्यातूनच पिचड विरोधकांची मोट बांधून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अगस्ति कारखान्याची सत्ताही ताब्यात घेतल्याने अकोल्यात एकप्रकारे राजकीय वादळ उठले.

अकोल्यात राष्ट्रवादीनंतर शिवसेनेची मोठी ताकद असल्याचे समजले जाते. आजवरच्या निवडणुकांतील मतदानाची आकडेवारी पाहता ही गोष्ट अधिक स्पष्टपणे समोरही येते. मात्र अकोल्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव आणि गेली वर्षोनुवर्ष एकाच गटाच्या ताब्यात असलेला पक्ष यामुळे जिंकण्याची क्षमता असतानाही शिवसेनेला अकोल्यात फार मोठे काही करता आले नाही.

त्यातच सहा महिन्यांपूर्वी राज्यात राजकीय भूकंप होवून त्यातून शिवसेनेत उभी फूट पडल्याने या पक्षाची ताकद विभागली गेली आहे. त्यातही पदाधिकार्‍यांचे खांदेपालट करताना पक्षाने गेल्या दीड दशकांपासून ज्यांच्या हातात सूत्रे होती त्यांच्याच घरात पदांची खिरापत वाटल्याने गेली वर्षोनुवर्ष पक्षासाठी राबणार्‍या अनेकांच्या मनात सल निर्माण झाली.

त्यातून आदिवासी ठाकर समाजातून पुढे आलेले व यापूर्वी पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले मारुती मेंगाळ यांनाही आपल्या राजकीय भवितव्याबाबत चिंता वाटू लागली. या संधीचा फायदा घेत विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा राजकीय खेळी करताना मारुती मेंगाळांना गळाला लावण्याचा प्रयोग केला.

अर्थात मारुती मेंगाळ राष्ट्रवादीत जाणार असल्याची जोरदार चर्चा अकोल्यात सुरु असली तरीही अद्याप खुद्द मेंगाळ यांनी मात्र त्यावर कोणतेही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही. मात्र त्यांच्या सोडचिठ्ठीच्या चर्चांनी आधीच फुटीचा सामना करणार्‍या शिवसेनेत मात्र खळबळ उडाली असून पक्षातील अंतर्गत गटबाजीही वेळोवेळी उफाळून आली आहे.

एकीकडे राष्ट्रवादीशी लढण्याची ताकद असलेल्या शिवसेनेत अंतर्गत कलहाने वातावरण दूषित झालेले असताना आता त्या पक्षातील जनमानसात ‘प्रतिमा’ असलेले नेते पळविण्याची योजना रंगात येत असतांनाच आता तालुक्याच्या पूर्वेकडून राष्ट्रवादीलाच हादरा देण्याची योजना आखली जात असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT