सोलापूर महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस–शिवसेना युती जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये असंतोष उफाळून आला आहे.
माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी ही युती आत्मघातकी ठरेल असा इशारा देत निवडणूक न लढवण्याची भूमिका जाहीर केली आहे.
शिवसेनेसोबतच्या युतीमुळे मुस्लिम समाजात चुकीचा संदेश जाईल आणि राष्ट्रवादीचे नुकसान होईल, असा दावा खरादी यांनी केला.
Solapur, 28 December : सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय जाहीर करताच त्याचे पडसादही उमटण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेसोबत युती करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय आत्मघातकी ठरेल, असा इशारा माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी दिला आहे. तसेच, शिवसेनेसोबत युती झाल्याने आपण प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढवणार नाही. वेळप्रसंगी घरी बसेन. पण, अशा युतीत राष्ट्रवादीकडून लढणार नाही, असेही खरादी यांनी स्पष्ट केले.
सोलापूर महापालिकेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती जाहीर झाली आहे. दोन्ही पक्ष महापालिकेच्या १०२ जागांपैकी प्रत्येकी ५१ जागा लढवणार आहेत. दोन्ही पक्षाच्या युतीची घोषणा शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, सहसंपर्कप्रमुख साठे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, सुधीर खरटमल, नलिनी चंदिले आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी शिवसेनेने सोबतच्या युतीची घोषणा होताच तीव्र नापासंती दर्शविली. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम समाजासाठी अनेक सकारात्मक व ठोस निर्णय घेतले आहेत. त्यांच्या नेतृत्वाकडे मुस्लिम समाज मोठ्या आशेने पाहत आहे. त्यातूनच मुस्लिम समाजातील अनेक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.
असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत युती निर्णय घेतला आहे. मात्र, ह्या युतीमुळे राष्ट्रवादीचे फार मोठे राजकीय नुकसान होणार आहे. शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने मुस्लिम समाजात चुकीचा संदेश जाईल, आणि त्याचा थेट फटका राष्ट्रवादीला बसेल. ॲड. यू. एन. बेरिया यांच्यासारखे ज्येष्ठ मुस्लिम नेते पक्षात आले आहेत.
अजित पवार यांनी मुस्लिम समाजासाठी ठोस भूमिका घेत सना मलिक यांना आमदारकीची संधी दिली, तर इद्रिस नाईकवाडी यांना विधान परिषदेवर पाठवले. याशिवाय हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री केले आहे. ते जरी महायुतीमध्ये असले, तरी त्यांची भूमिका धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीकडे आकर्षित होत आहे, असेही खरादी यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक १४, १५, १६, १७ आणि २० या प्रभागांतून राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून येण्याची मोठी शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत युती झाल्याने, या प्रभागांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. विरोधी पक्ष त्याचा उलटा प्रचार करतील आणि त्याचा थेट तोटा राष्ट्रवादीला सहन करावा लागेल.
शिवसेनेसोबत राष्ट्रवादीची युती झाल्यास आपण घड्याळाच्या चिन्हावर सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ मधून निवडणूक लढवणार नाही. वेळप्रसंगी घरी बसेन, मात्र अशा युतीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार नाही, असा इशारा खरादी यांनी पक्षाला दिला आहे.
Q1. सोलापूर महापालिकेसाठी कोणत्या पक्षांची युती झाली आहे?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती जाहीर झाली आहे.
Q2. दोन्ही पक्ष किती जागा लढवणार आहेत?
१०२ जागांपैकी प्रत्येकी ५१ जागा दोन्ही पक्ष लढवणार आहेत.
Q3. रियाज खरादी यांनी युतीला विरोध का केला आहे?
शिवसेनेसोबतच्या युतीमुळे मुस्लिम समाजात चुकीचा संदेश जाईल, असे त्यांचे मत आहे.
Q4. खरादी यांनी निवडणुकीबाबत काय निर्णय जाहीर केला आहे?
ते प्रभाग क्रमांक १४ मधून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.