

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत भाजप–राष्ट्रवादी युतीत राष्ट्रवादीला फक्त ४ जागा मिळाल्याने पक्षातील नाराजी उफाळली.
उमेदवारी न मिळालेल्या माजी नगरसेवकांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून निवडणूक जिंकून अजित पवारांकडे तक्रारी मांडल्या.
एबी फॉर्म न दिल्याबद्दल संतप्त झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्हा व राज्यस्तरीय नेत्यांना जोरदार झापले.
Solapur, 28 December : मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी केली होती. आघाडीत राष्ट्रवादीला अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या माजी नगरसेवकांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यातील बहुतांश नगरसेवकांनी परवा उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आणि मंगळवेढ्यात घडलेले राजकारण त्यांच्या कानावर घातले. आम्हाला एबी फॉर्मसुद्धा मिळाला, अनेक उमेदवार थोडक्या मतांनी हरले, अशी तक्रार केली. त्यावर अजितदादांनी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आणि राज्य स्तरावरील प्रमुख पदाधिकाऱ्याला झाप झापले..
‘मी सर्वसामान्य नागरिकांची कामे भल्या सकाळपासून रात्री उशिरापर्यंत करत असतो. नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची कामे झाल्यानंतर त्याचा पक्षाला फायदा होतो. नगरपालिका निवडणुकीत तुम्ही इच्छुक पदाधिकाऱ्यांना एबी फॉर्म न देता पक्ष चक्क दुसऱ्याच्या दावणीला बांधला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दोन प्रमुख नेत्यांना जाब विचारल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे.
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ चार जागा आल्या होत्या. त्यातील दोन जागांवर पक्षाला यश मिळाले. मागील २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार भारत भालके असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने थेट नगराध्यक्षपद आणि काही जागा पदरात पाडून नगरपालिकेवर पाच वर्षे सत्ता गाजवली होती.
या वेळीही राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला पाहिजे, अशी भूमिका निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्याकडे व्यक्त करण्यात आली होती. त्या पद्धतीने कामाला लागण्याचे आदेशही अजितदादांनी दिले होते. मात्र, ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाशी युती केली. पक्षाच्या वाट्याला केवळ चार जागा आल्या.
उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून उमेदवारी घेत विजय संपादन केला. विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवडणुकीत घडलेल्या नाट्यमय घडामोडी अजित पवार यांच्या कानावर घालण्यात आल्या.
राष्ट्रवादीकडे एबी फॉर्म मागितला असतानही एबी फॉर्म दिला गेला नाही. काही जागा थोडक्यात गमावावा लागल्या. अपेक्षित यश मिळाले नसल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ, प्रांतिक सदस्य अरुण किल्लेदार, जिल्हा उपाध्यक्ष भारत नागणे, सोमनाथ माळी, मतदारसंघाचे अध्यक्ष संजय कट्टे, गणेश धोत्रे, प्रवीण गोवे,अनिल बोदाडे, प्रीती सूर्यवंशी, अश्विनी धोत्रे या पदाधिकाऱ्यांनी भेटीदरम्यान अजितदादांच्या कानावर घातल्या.
एबी फार्मही न मिळाल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली. त्यावर संतापलेल्या अजित पवारांनी पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख आणि राज्य स्तरावरील मंगळवेढ्यातील नेत्याला फोन करून झालेल्या प्रकाराबद्दल झाप झाप झापले. ऐन वेळी त्यांना अचानक अजित पवारांचा फोन आल्याने ते प्रमुख नेतेही गोंधळून गेले होते. शेवटी रात्री उशिरा त्यांनी त्यांच्या सोयीचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देत त्यातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तंबीनंतर मंगळवेढ्याच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय नाट्यमय घडामोडी घडतात? त्यातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला उपनगराध्यक्षपद पदरात पाडून घेते का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
Q1. मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
भाजपसोबत युतीत राष्ट्रवादीला केवळ ४ जागा मिळाल्या.
Q2. उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांनी काय केले?
त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून निवडणूक लढवून विजय मिळवला.
Q3. अजित पवार का संतप्त झाले?
इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म न दिल्याबद्दल आणि पक्षाचे नुकसान केल्याबद्दल.
Q4. पुढील काळात कोणत्या पदाबाबत उत्सुकता आहे?
मंगळवेढ्याच्या उपनगराध्यक्षपदावर राष्ट्रवादी दावा मिळवते का, याकडे लक्ष आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.