Shivsena Leader Meeting Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : सोलापूर दक्षिणमधून अमर पाटील शिवसेनेचे उमेदवार; राऊतांच्या संकेतामुळे महाआघाडीत खळबळ!

Solapur South Assembly Constituency : महाविकास आघाडीच्या सोलापुरातील नेत्यांची बैठक आटोपून राऊत हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या देगाव येथील फार्म हाऊसवर पोचले.

Vijaykumar Dudhale

Solapur News : शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज (ता. 10 डिसेंबर) सोलापूरच्या दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकत्रित बैठकही घेतली. महाविकास आघाडीच्या सोलापुरातील नेत्यांचा लढण्याचा फॉर्म्युला राज्यात नेण्याची घोषणा केली. मात्र, जाता जाता या ऐकीला टाचणी लावण्याचे कामही राऊत यांनी एक अनौपचारिक गप्पांमधून केले. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून अमर रतिकांत पाटील हे उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेतच त्यांनी दिले, त्यामुळे काँग्रेसचे काय?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (Amar Patil will be Shiv Sena's candidate from Solapur South; Sanjay Raut)

खासदार राऊत यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात नेहमीप्रमाणे भाजपवर हल्लाबोल करत केली. पत्रकार परिषदेत मोदी-शाह यांच्यापासून तीन राज्यांतील भाजपचा विजय, तेलंगणातील काँग्रेसने मारलेली बाजी आणि निवडणूक बॅलेट पेपरवर घ्याव्यात, इथपर्यंत सर्व विषयांवर मुक्तपणे भाष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वार्तालापानंतर संजय राऊत यांनी शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या घरी महाविकास आघाडीच्या सोलापुरातील नेत्यांची बैठक घेतली. तो कार्यक्रम आटोपून राऊत हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या देगाव येथील फार्म हाऊसवर पोचले. त्या ठिकाणी राऊत आणि संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्यासाठी हुरडा पार्टीचा बेत आयोजित केला होता. हुरड्यानंतर राऊतांनी सोलापुरातील प्रसिद्ध शीक-कढई मटणावर ताव मारला.

जेवणानंतर झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये संजय राऊत यांनी हा विधानसभा मतदारसंघ कोणाचा, असा सवाल केला. त्यावेळी उपस्थित शिवसेना नेत्यांना सुभाष देशमुख यांचा असे सांगितले. त्यावर अमर रतिकांत पाटील यांच्याकडे बोट करत ‘तू लढणार आहेस तो कुठला’ असा सवाल केला. त्यावेळी उपस्थितांनी दक्षिण सोलापूर असे सांगितले. त्यावेळी राऊतांनी ‘तोच ना,’ असे म्हणत दक्षिण सोलापूर मतदारसंघातून अमर पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत दिले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत दक्षिण सोलापूर हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेलेला आहे. तेथून काँग्रेसने निवडणूक लढवलेली आहे. तसेच, शिवसेना-भाजप युतीमध्ये तो भाजपकडे होता. त्यामुळे महाविकास आघाडीत तो काँग्रेसच्या वाट्याला जाईल, अशी चर्चा असतानाच संजय राऊत यांच्या या विधानामुळे काँग्रेसची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अमर पाटील यांचे वडिल रतिकांत पाटील यांनी यापूर्वी दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर मतदारसंघात पाटील यांचे नेटवर्क आहे. त्यांनी विधानसभेची तयारीही गेल्या काही वर्षापासून केली आहे. गेल्या 2019 च्या निवडणुकीतही ते इच्छूक होते. पण हा मतदारसंघ भाजपसाठी सोडावा लागला होता. आता शिवसेनेकडून अमर पाटील यांच्या नावाचे संकेत खुद्द राऊत यांनीच दिल्याने महाविकास आघाडीत त्याचे काय पडसाद उमटतात, हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT