Maharashtra Political News : लोकसभा निवडणूक जवळ येईल तशी महायुतीतील काही जागावाटपाचा तिढा आवळत चालल्याचे दिसून येते. त्यातील सातारा एक जागा आहे. येथून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचे नेते, खासदार उदयनराजे भोसले आणि माजी आमदार नरेंद्र पाटील आमने-सामने उभे ठाकले आहेत. त्यासाठीच उदयनराजे तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. अद्याप त्यांची दिल्लीश्वरांशी भेट झाली नसली तरी त्यांच्यात आज चर्चा होण्याची शक्यता आहे. साताऱ्यात निर्माण झालेला पेच आणि उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत केंद्रीय गृहमंत्रीच अमित शाह हेच निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, महायुतीतील जागावाटपाचे काम 80 टक्के काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित 20 टक्के काम येत्या दोन दिवसांत संपवू. दरम्यान, आज सायंकाळी भाजपची निवडणूक समितीची बैठक आहे. त्यात पक्षाच्या वाट्याला येतील, त्यामधील तिढा असलेल्या जागांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल. त्यातील ज्यांचा तिढा सुटू शकतो त्यांच्या जागांबाबत राज्यस्तरावर निर्णय घेण्यात येईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, साताऱ्यातून लोकसभा लढवण्यासाठी भाजपकडून अनेक नेते इच्छुक आहेत. त्यातील उदयनराजेंनी उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदर पावले उचलल्याचे दिसून येते. सध्या ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीसाठी दिल्लीला आहेत. ते तीन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. उदयनराजेंच्या या आक्रमक भूमिकेबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, अमित शाह आणि त्यांची शनिवारी (ता. 23) सायंकाळी भेट होणार आहे. या भेटीत उदयनराजे त्यांचे मत मांडतील. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री शाह हे उदयनराजेंबाबत अंतिम निर्णय घेतील, असे फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितले.
कोल्हापूर जागेसाठी महाविकास आघाडीने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सन्मान राखत बिनविरोध निवड करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. यावर छेडले असता फडणवीस म्हणाले, महायुतीने साताऱ्यातून उदयनराजेंना (Udayanraje) उमेदवारी दिली तर त्यांना बिनविरोध करणार का? याचेही उत्तर त्यांनी द्यावे. आम्हा सर्वांना शाहू महाराजांचा सन्मान आहेच. उदयनराजेंचाही सन्मान सर्वांना असावा. आता हे राजकारण आहे. त्यामुळे अशा मागण्या होतच राहतील, असे म्हणत कोल्हापूरमधून महायुती उमेदवार देणार, असे फडणवीसांनी सूचित केले.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.