Farmers Association News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nagar News : तक्रारी करूनही सरकारचे दुर्लक्ष; शेतकरी संघटना रस्त्यावर, गाळप बंद पाडणार...

Pradeep Pendhare

Maharashtra Farmer News : नगर जिल्ह्यातील एकाही कारखान्याने गाळपापूर्वी ऊसदर जाहीर केला नाही. राज्य सरकारकडे तक्रारी करूनदेखील दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता गाळप हंगाम बंद पाडणार, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला.

श्रीरामपूर येथील हरिगाव फाटा येथे शेतकरी संघटनेतर्फे काल (बुधवारी) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन तीव्र असल्याने ते बराच वेळ सुरू होते. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

नगर जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू करून महिना होत आला आहे, परंतु एकाही कारखान्याने गाळपापूर्वी ऊसदर जाहीर केला नाही. पहिली उचल अजून जमा केली नाही. यामुळे शेतकरी संघटना चांगली आक्रमक झाली आणि रस्त्यावर उतरली.

अनिल औताडे म्हणाले, "गाळपापूर्वी ऊसदर जाहीर न करणे ही कृती कारखानदारांची घटनाबाह्य आहे. त्यामुळे कारखान्याच्या व्यवस्थापन समितीवर प्रादेशिक सहसंचालक, साखर आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून कारवाई झाली पाहिजे. परंतु साखर कारखानदारांचे सर्वेसर्वा सरकारमध्ये आहेत. त्यामुळे कारवाई होत नाही."

नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीची पाचशे रुपये आणि यंदाची पहिली उचल साडेतीन हजार रुपये देणे व्यवहार्य होते. केंद्र सरकारनेदेखील एफआरपी दर हाच घोषित केला आहे, परंतु कारखानदारांकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे, अशी टीका अनिल औताडे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर जिल्ह्यातील बहुतांश सहकारी साखर कारखाने हे साडेचारशे ते नऊशे कोटी रुपये तोट्यात दाखविले जात आहेत. हा दाखवलेला तोटा हा कारखाना व्यवस्थापन व राज्य सरकारचे पाप आहे. यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा काय दोष?

नगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी पहिली उचल साडेतीन हजार रुपये समान पद्धतीने ऊस उत्पादकांना द्यावी. उर्वरित दीड हजार रुपये राज्य सरकारने अनुदान म्हणून द्यावे, अशी मागणी अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेकडून ऊस उत्पादकांच्या वतीने करण्यात आली.

युवराज जगताप, विजय मते, त्रिंबक भद्गले, साहेबराव चोरमल उपस्थित होते. तहसीलदार श्रीरामपूर मिलिंद वाघ यांनी आंदोलकांशी चर्चा केली. निवेदन स्वीकारले. पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT