Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करत उच्च न्यायालयात याचिका; अडचणी वाढणार?

Akshay Sabale

BJP News : कोरोना महामारीत भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी कोरोना रूग्णांवरील उपचारांच्या नावाखाली कोट्यवधी रूपयांचा घोटाळा केला. 200 हून अधिक मृत रूग्णांना जिवंत दाखवून विविध सरकारी योजनांतून निधी लाटला, असे गंभीर आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील मायणी ( ता. खटाव ) येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायामूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे 5 जुलैला सुनावणी होणार आहे.

याप्रकरणी जयकुमार गोरे, त्यांची पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्यात सहभागी इतर काही जणांवर तातडीनं गुन्हे दाखल करावेत. तसेच, संपूर्ण गैरव्यवहाराचा सखोल तपास उच्च न्यायालयाच्या (High Court) सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या नियंत्रणांखाली करण्यासाठी न्यायालयानं निर्देश द्यावे, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरणं काय?

मायणी-खटाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटर रूग्णालय सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी ताब्यात घेतलं होतं. 27 मे 2020 पासून येथे कोरोना उपचार केंद्र चालविण्यात येत होते.

संबंधित रूग्णालय आधीपासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न होते. संस्थेचे अध्यक्ष जयकुमार गोरे (Jaykumar Gore), त्यांची पत्नी सोनिया गोरे आणि अन्य आरोपींनी मृत कोरोना रूग्णांवर उपचार तसेत कर्तव्यावर नसलेल्या डॉक्टरांच्या खोट्या सह्या, बनावट कागपत्रांद्वारे राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांमधून गैरव्यवहार केल्याचं याचिकेत म्हटलं आहे.

याचिकेत अजून काय आरोप?

  • महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी केलेल्या करारनाम्यात अनेक बोगस डॉक्टरांची नावे दाखविण्यात आली. ज्या डॉक्टरांनी प्रत्यक्षात कुठल्याही रूग्णांवर उपचार केले नाहीत.

  • करारनाम्यात 46 डॉक्टरांची बोगस नावे घुसवून स्वत:च्या फायद्यासाठी सरकारची आणि संस्थेची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाली.

  • कोरोना उपचार केंद्र म्हणून रूग्णालयात ताब्यात घेतल्यानं सरकारनं एक कोटी रूपयांची औषधे, इंजेक्शन पुरवली होती. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे पैसेही दिले होते. असं असतानाही बोगस रूग्णांची नोंदणी करून महात्मा फुले जन आरोप योजनेचा गैरलाभ उठवला.

  • कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या 200 हून अधिक रूग्णांना दोन-तीन महिन्यानंतर पुन्हा जिवंत दाखवले आणि ते रूग्णालयात दाखल असल्याची नोंद करून विविध सरकारी योजनांतर्गत उपचाराचे कोट्यवधी रूपये लाटले.

  • संस्थेचा कोणताही ठराव न करता बोगस लेटरहेड, बनावट शिक्क्यांच्या आधारे बनावट बँक खाते उघडले आणि गैरव्यवहाराचे पैसे वळते केले.

  • कोरोनाचा साधारण संसर्ग झालेल्या रूग्णांना डिस्चार्ज देताना 'आयसीयू'च्या बेडवर झोपवले आणि कोरोना उपचाराच्या रमकेचे पैसे लाटण्यात आले.

  • रूग्णालयात सात व्हेंटिलेटर होते. त्यामुळे महिन्यात फक्त 21 रूग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेऊ शकत होते. पण, त्याठिकाणी 150 ते 200 रूग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवल्याच्या बोगस नोंदी केल्या.

दरम्यान, शिवसेनेनं ( ठाकरे गट ) कोरोना रूग्णांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, असा आरोप सतत भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात येतो. त्यातच भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर कोरोना काळात गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपचे नेते यावर कोणती प्रतिक्रिया देणार? याकडे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT