Praniti shinde-Mahesh kothe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : तुमची गरज आता संपली का?; महेश कोठेंचा प्रणिती शिंदेंना विधानसभा जागांवरून सवाल

Assembly Election 2024 : सोलापूरच्या शहराध्यक्षांनी मागणी करणं एकवेळ समजू शकतो. पण, खासदार असलेल्या वरिष्ठ नेत्यानेही तीच मागणी केली तर मित्रपक्षासोबतचे संबंध खराब होऊ शकतात.

Vijaykumar Dudhale

Solapur, 07 September : सोलापूर जिल्ह्यातील अकरापैकी सात मतदारसंघावर काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. त्याला खासदार प्रणिती शिंदे यांनीही दुजोरा देत तो दावा बळकट केला आहे. त्यावरून मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांनी नाराजी व्यक्त केली. त्या दाव्यातून ‘तुमची गरज आता संपली का’ असाच मेसेज जातो. लोकसभेतील यशात सर्वांचाच वाटा आहे, त्यामुळे कोणी अतिउत्साही बनू नये, असा सल्लाही कोठे यांनी नाव न घेता खासदार शिंदे यांना दिला.

काँग्रेस (Congress) पक्षाच्या दाव्यावर बोलताना महेश कोठे यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) वातावरण खराब होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

ते म्हणाले, मागणी करणं चुकीचं नाही. पण, हा निर्णय स्थानिक नेत्यांच्या हाती नाही. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत जागा वाटपावर निर्णय होणार आहे. त्यामुळे मित्रपक्ष आणि आमच्या पक्षालाही विनंती राहणार आहे की, ‘तुम्ही मागणी करा; पण वातावरण खराब होऊ नये, याची दक्षता घ्या.’

सोलापूरच्या (Solapur) शहराध्यक्षांनी मागणी करणं एकवेळ समजू शकतो. पण, खासदार (प्रणिती शिंदे) असलेल्या वरिष्ठ नेत्यानेही तीच मागणी केली तर मित्रपक्षासोबतचे संबंध खराब होऊ शकतात. त्यातून, ‘तुमची गरज आता संपली का?’, असाच मेसेज जातो. त्यामुळे कुठल्याही नेत्याने अथवा कार्यकर्त्याने अशा प्रकारचे विधान करू नये, की ज्याच्यामुळे आपले मित्रपक्षाशी संबंध खराब होतील, असा सल्लाही कोठे (Mahesh Kothe) यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीतील यशात सर्वांचाच वाटा आहे. हे कोणीही नाकारून चालणार नाही. कुणाचा कमी असेल, तर कुणाचा जास्त असेल. पण प्रणिती शिंदे यांच्या विजयात सगळ्यांचा वाटा आहे. सगळ्यांची मदत मिळाल्यानंतरच काँग्रेसची जागा निवडून आली आहे.

एक जागा निवडून आल्याने कोणी अतिउत्साही होण्यापेक्षा आगामी काळात विधानसभेच्या जागा आपल्या पक्षाच्या कशा निवडून येतील. महापालिकेवर आपल्या पक्षाची सत्ता कशी येईल. यावर फोकस करून प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून वागण्याची गरज आहे, असे आवाहनही महेश कोठे यांनी काँग्रेस पक्षाला केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT