Satyajeet Patankar join BJP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satyajeet Patankar : उदयनराजेंनी ‘डच्चू देण्याची’ कोटी करताच सत्यजित पाटणकरांनी बोलून दाखवली ‘आयुष्यातून उठण्याची’ भीती!

Udayanraje Bhosale statement : अतुल भोसले यांनी ‘बच्चूदादा यांचं टोपणनाव आपण बदलू,’ असे सांगून ‘नव्या नावाच्या शोधाला लागा. मीही तुम्हाला मार्गदर्शन करतो,’ असे कार्यकर्त्यांना सुचविले.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 10 June : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाटणमधील नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी आज (ता. 10 जून) मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेशावेळी आमदार अतुल भोसले यांनी पाटणकर यांचा उल्लेख बच्चूदादा असा केला. पुढे बोलताना ‘सत्यजित यांचे टोपण नाव बच्चूदादा आपण बदलू’ असे सांगताच खासदार उदयनराजेंनी माईक हातात घेत ‘बच्चू बच्चू म्हणून डच्चू देऊ नका’ अशी कोटी केली. त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये प्रचंड हशा पिकला. पण पाटणकरांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. आपल्या भाषणात तो धागा पकडून पाटणकरांनी ‘महाराज, आपण चेष्टेत म्हणालात, पण प्रत्यक्षात डच्चू दिला तर आम्ही आयुष्यातून उठू,’ अशी मनातील भावना बोलून दाखवताच पुन्हा एकदा जोरदार हशा पिकला.

सत्यजित पाटणकर (Satyajeet Patankar ) यांच्या भाजप प्रवेशावेळी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार अतुल भोसले आणि मान्यवर उपस्थित होते. रवींद्र चव्हाण यांनी पाटणकरांचे पक्षात स्वागत केले. त्यानंतर बोलताना हा किस्सा घडला.

अतुल भोसले (Atul Bhosale) यांनी ‘बच्चूदादा यांचं टोपणनाव आपण बदलू,’ असे सांगून ‘नव्या नावाच्या शोधाला लागा. मीही तुम्हाला मार्गदर्शन करतो,’ असे कार्यकर्त्यांना सुचविले. तेवढ्यात शेजारी उभे असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी माईक हातात घेऊन ‘बच्चू बच्चू म्हणून डच्चू देऊ नका म्हणजे झालं,’ अशी कोटी केली. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र, सत्यजित पाटणकर यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

भारतीय जनता पक्षाची (BJP) संपूर्ण ताकदीने पाटण तालुक्यात बांधणी करावी, असे आवाहनही आमदार भोसले यांनी केले. आमदार भोसले यांच्यानंतर सत्यजित पाटणकर यांनी पाटण तालुक्यातून आलेल्या निवेदनाबाबत भाष्य केले. पाटणमध्ये नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात यावी आणि त्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज असे ठेवण्यात यावे, अशी पाटण तालुक्याच्या वतीने पाटणकरांनी मागणी केली.

पाटणकरांनी पुढे बोलताना उदयनराजेंच्या कोटीचा संदर्भ देत ‘अत्यंत डोळे झाकून, विश्वास ठेवून आम्ही मंडळींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. महाराज (उदयनराजे भोसले) आपण चेष्टेत म्हणालात; परंतु प्रत्यक्षात डच्चू दिला तर आम्ही आयुष्यातून उठू,’ असे म्हणत मनातील भावनाच बोलून दाखवली. पण, लगेच सावरत ‘असं काही होणार नाही, असेही सांगितले.

तुम्हा सर्वांच्या सहकार्याने पाटण तालुक्यात तळागाळात आणि लहानातील लहान कार्यकर्त्यांपर्यंत भाजप पोचविण्याचा शब्द आम्ही देतो. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागणार, एवढा शब्द देता,’ असेही पाटणकर यांनी भाजप नेत्यांना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT