Amit Shah Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Amit Shah : शरद पवार, पृथ्वीराज चव्हाणांनी महाराष्ट्राला काय दिले? अमित शाह यांनी हिशोब मागितला

BJP leader Amit Shah criticized Sharad Pawar and Prithviraj Chavan in a meeting in Satara : भाजप नेते अमित शाह यांनी सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड दक्षिण इथं सभा घेऊन शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली.

सरकारनामा ब्युरो

Satara News : "केंद्रात शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण हे 2004 ते 2014 मध्ये दहा वर्षे सत्तेत होते. त्या काळात त्यांनी महाराष्ट्राला केवळ एक लाख 91 हजार कोटी रुपये दिले. मोदी सरकारही 2014 ते 2024 पर्यंत दहा वर्षे सत्तेत आहे.

त्या काळात मोदी सरकारने महाराष्ट्राला 10 लाख 15 हजार 890 कोटी रुपये दिले. त्यामुळे भाजपने नव्हे, तर काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांनाही महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. त्यांना जनतेने जाब विचारा", असे आवाहन केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी केले.

कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ विंग येथील अमित शाह यांची जाहीर सभा झाली. शरद पवार (Sharad Pawar) व त्यांच्या कंपनीने महाराष्ट्रावर अन्याय केला आहे, असा आरोप करत शाह यांनी त्यांच्या काळात काहीही काम केले नसल्याचा ठणकावून सांगितले.

अमित शाह (Amit Shah) म्हणाले, ‘‘त्यांच्या काळात काहीही कामे झाली नाहीत. मात्र, राज्यात विकासाचा वेग महायुतीचे सरकार आल्यानंतर सुरू झाला. राज्यात विकासकेंद्रित काम करण्यास महायुती कटिबद्ध आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीची सत्ता अबाधित राहील. त्या सत्तेत अतुल भोसले आमदार म्हणून असतील, याचा मला विश्वास आहे". यावेळी एकमुखी निर्णय घेऊन त्यांना आमदार करा. कऱ्हाड दक्षिणेत तुमच्या 'एमआयडीसी'त राष्ट्रीय स्तरावरचा मोठा प्रकल्प देण्याची व कऱ्हाडच्या विकासाला हातभार लावण्याचा माझा शब्द मी खरा करून दाखवतो, असे अमित शाह यांनी म्हटले.

शाह म्हणाले, ‘‘काश्मीरमधून 370कलम आम्ही हटवले. मात्र, तेथे काँग्रेसप्रणित सत्ता येताच 370 कलम परत आणण्यास विधानसभेत ठराव झाला. मात्र, राहुल गांधी यांच्या चार पिढ्या जरी सत्तेत आल्या तरी काश्मीरमध्ये 370कलम आम्ही लागू होऊ देणार नाही. जम्मूमध्ये यांचे सरकार येताच कलम लागू करण्याचा ठराव केला असला, तरी त्यांचा तो निर्णय आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही". काश्मीर व जम्मूत काँग्रेसच्या काळात दहशतवाद फोफावला होता. मात्र, आम्ही पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक करून सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे आमचा जीव गेला, तरी चालेल. मात्र, पाकिस्तानधार्जिणा एकही निर्णय आम्ही होऊ देणार नाही, असेही शाह यांनी म्हटले.

अतुल भोसले यांनी कऱ्हाड दक्षिणच्याही युवकांच्या भाजपकडून मोठ्या अपेक्षा आहेत. येथे मोठी फाइव्ह स्टार एमआयडीसी व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात सिंचन योजना सहकार तत्त्वावर आहेत. त्या योजना पुनर्गठित करण्यासाठीही आपले सहकार्य अपेक्षित आहे. त्याबाबतचा पाठपुरावा आम्ही घेत आहोत. माजी मुख्यमंत्री, विद्यमान आमदारांच्या घराशेजारीच झोपडपट्टी आहे. ती त्यांना हटवता आली नाही. त्यामुळे त्या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

अमित शाह म्हणाले....

- काँग्रेस व राहुल गांधी खोट बोलणारी फॅक्टरी आहे.

- लष्करासहीत अग्निवीरबाबत केलेले आरोप खोटे आहेत.

- अग्निवीर हा लष्कराला युवा करण्याचा कार्यक्रम आहे.

- त्यामुळे त्या निर्णयाने लष्कराचा सन्मान वाढला आहे.

- अग्निवीरमधून निवृत्त होणाऱ्या जवानाला नोकऱ्यांत संधी देणार

- भाजपचा वादा म्हणजे काळ्या दगडावरील लकीर आहे.

- वादा पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.

- काँग्रेसला वन रॅंक वन पेन्शनचा निर्णय 75 वर्षे घेता आला नाही.

- मात्र मोदी सरकार आल्यानंतर तो निर्णय घेत जवानांचा आदर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT