Solapur, 09 November : अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संरक्षण मिळावे; म्हणून भाजपसोबत गेले आहेत. त्यामुळे ते भाजपला नियम आणि अटी सांगू शकत नाहीत. भाजपला येत्या निवडणुकात विजय मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे. पण, मिळाला तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा मानस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केला आहे, त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं काय म्हणणं, हे बघावं लागेल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादा आणि एकनाथ शिदेंना डिवचले.
सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) बोलत होते. जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या विधानावरून शिंदे आणि अजितदादांना चिमटा काढला आहे. तसेच त्यांनी अजित पवार यांचे भाजपसोबत जाणे, ईडी, सीबीआय यांच्या कारवाया आणि समाजात फूट पाडण्याचे सुरू असलेले प्रयत्न यावर भाष्य केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश नेते हे चौकशी सुरू होते आहे म्हटल्यावर एकत्रितपणे भाजपसोबत गेले आहेत. तिकडं त्यांना संरक्षण मिळाले आहे, ते कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मुलाखतीत केलेल्या विधानावरून दिसत आहे. त्यामुळे अजित पवार आणि त्यांचे सहकारी भाजपसोबत का गेले, हे भुजबळांच्या विधानावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, छगन भुजबळ यांनी स्वतः हून सांगितलं आहे की, ओबीसी असल्याने ईडी आणि यंत्रणांनी मला फार त्रास दिला आहे. काही लोकांच्या चौकशी सुरू झाल्या, त्यामुळे चौकशी सुरू होतायत म्हटल्यावर एकत्रितपणे येऊन तिकडे (भाजपसोबत) जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तिकडचं संरक्षण मिळवलं, असं भुजबळांच्या बोलण्यातून दिसतंय, त्यामुळे ते तिकडं का गेले हे लोकांना पुन्हा एकदा कळालं आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक है तो सेफ है आणि बटेंगे तो कटेंगे या विधानाचाही जयंत पाटील यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी विभागण्याचे काम भाजपनेच केलं आहे. समाज एक राहण्यापेक्षा समाजात विघटन कसं होईल, यासाठी त्यांचे मागच्या दोन तीन महिन्यांपासून उद्योग सुरु आहेत, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
हिंदुंची मतं एकत्रित करण्यासाठी एक आमदार महाराष्ट्र फिरून आले आणि टोकाची भाषा केली. महाराष्ट्रमधील हिंदू-मुस्लिम समाज हा समजूतदार आहे, त्यांना समजतं की निवडणुकीत पोळी भाजण्यासाठीच हे सगळं बोलतात. मात्र, महाराष्ट्रमधील जनता यांच्यामुळे विचलित होतं नाही. इथल्या जनतेचे प्रश्न हे वेगळे आहेत, महागाई, महिला अत्याचार अशा प्रशांवर बोला. महाराष्ट्र प्रगतीसाठी बोला, ते न बोलता दुसरेच विषय इथे येऊन बोलतात, हे दुर्दैवी आहे, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली.
बंडखोरांवर कडक कारवाई करणार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केलेली आहे. त्या सर्व बंडखोरांवर परवापर्यंत कारवाई करण्यात येईल, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.