Prashant Paricharak-Rajan Patil-Umesh Patil-Dhananjay Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भीमा कारखान्याच्या निवडणुकीत विधानसभेची साखरपेरणी!

निवडणुकीच्या प्रचारातील वास्तविकता जर पाहिली तर विविध राजकीय पक्षातील व सामाजिक संघटनेतील नेते या निवडणुकीच्या माध्यमातून उपलब्ध व्यासपीठाचा आपले अस्तित्व अधिक बळकट करण्यासाठी तसेच भविष्यातील राजकीय स्थिरतेचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी उपयोग करीत आहेत.

चंद्रकांत देवकते

मोहोळ (जि. सोलापूर) मोहोळ तालुक्यातील टाकळी सिंकदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (Bhima Sugar Factory) निवडणुकीत विद्यमान चेअरमन खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांच्या विरोधात माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) व प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांच्या पॅनलमध्ये निकराची झुंज असल्याचे चित्र आहे. मात्र, या साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात जनमताचा कानोसा घेता निवडणूक जरी भीमा सहकारी साखर कारखान्याची असली तरी दोन्ही गटाच्या बाजूने पेरणी मात्र विधानसभेचीच होत आहे, अशी चर्चा तालुक्यात आहे. (Assembly election prepration through Bhima sugar factory election)

एकंदरीत भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निकालाचा दूरगामी परिणाम पंढरपूर आणि मोहोळ या दोन मतदारसंघावर होणार, हे मात्र नक्की. पण, मोहोळ तालुक्यात फार मोठी राजकीय उलथापालथ होईल, हा अंदाज बांधणे धाडसाचे ठरेल. कारण, लोकशाहीमध्ये होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत (उदा. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार आदी) मतदारांची मानसिकता, पार्श्वभूमी व विचारप्रणाली, पक्षीय ध्येय-धोरणे वेगवेगळ्या प्रकारची असतात. त्यानुसार निकाल अपेक्षित असतात. एकमात्र नक्की आहे की, भीमा कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही गटाच्या राजकीय व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या विविध पक्षीय नेतेमंडळीवरून आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभेच्या निवडणुकीत कोण कुणाच्या गळ्यात गळा घालून मतदारासमोर मते मागण्यास जाणार, याची रंगीत तालीम मात्र या माध्यमातून होत आहे.

भीमा कारखान्याच्या निवडणुकीत ऊस उत्पादक सभासदाच्या व कामगारांच्या भविष्यकालीन हिताचा मॉडेल समोर ठेवणे अपेक्षित आहे. मात्र. प्रचारादरम्यान अन्य बाबींवरच अधिक भर दिला जात आहे. निवडणुकीच्या प्रचारातील वास्तविकता जर पाहिली तर विविध राजकीय पक्षातील व सामाजिक संघटनेतील नेते या निवडणुकीच्या माध्यमातून उपलब्ध व्यासपीठाचा आपले अस्तित्व अधिक बळकट करण्यासाठी तसेच भविष्यातील राजकीय स्थिरतेचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी उपयोग करीत आहेत.

विद्यमान चेअरमन खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणाऱ्या भीमा शेतकरी विकास पॅनेलच्या ‘कपबशी’ या चिन्हाच्या प्रचारासाठी माजी मंत्री, भाजप नेते लक्ष्मण ढोबळे, जिल्हा परिषदेचे सभापती विजयराज डोंगरे, शंकरराव वाघमारे, राष्ट्रवादीचे भगिरथ भालके, मानाजी माने, उमेश पाटील, रमेश बारसकर, कॉग्रेसचे सुरेश हावळे, सुरेश शिवपुजे, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे चरणराज चवरे , शैला गोडसे आदींचा समावेश आहे.

दुसरीकडे, माजी आमदार राजन पाटील व प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भीमा बचाव परिवर्तन पॅनेलच्या 'घडयाळ' चिन्हाच्या प्रचारासाठी दिलीप घाडगे, कल्याणराव पाटील, राष्ट्रवादीचे विक्रांत पाटील, प्रणव परिचारक, अंजिक्यराणा पाटील, कॉंग्रेसचे देवानंद गुंड पाटील, कृष्णदेव वाघमोडे, किशोर पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख अशोक भोसले, आदींसह अनेक लहान-मोठे नेते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT