Ganesh Wankar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Shivsena News : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल; सोलापुरात खळबळ

सरकारनामा ब्यूरो

Solapur : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोलापूर जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्यावर महिलेला शिवागाळ केल्याप्रकरणी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वानकर यांच्यासह एकूण सहा जणांवर उत्तर सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या मुळे सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (Atrocity case registered against Solapur District Chief of Shiv Sena Thackeray group)

दरम्यान, अवैध दारू व्यवसायाला विरोध केल्यामुळेच आपल्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशा खोट्या गुन्ह्याला आपण कदापि जुमानणार नाही. लोकहिताची कामे करताना धमक्यांना आपण घाबरणार नाही. खोट्या ॲट्रोसिटीला आपण कायद्याने उत्तर देणार असल्याचे सोलापूर (Solapur) शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुख वानकर यांनी सांगितले.

या प्रकरणी उषा मलिक हब्बू यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून वानकर यांच्यासह सहा जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी महिला उषा हब्बू यांचे पती खेड पाटी टोलनाकाच्या जवळ पानाची टपरी चालवतात. त्या पान टपरीच्या मागे शिवसेनेच्या ठाकरे गटचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर यांचे रिकामे प्लॉट आहेत. वानकर यांनी फिर्यादीला ही तुझी टपरी बेकायदेशीर आहे, असे म्हणत तुच्छतेने बोलत होते. त्यामुळे वानकर यांच्या विरोधात न्यायालयात खासगी फिर्याद देण्यात आली होती.

दरम्यान, न्यायालयात देण्यात आलेल्या फिर्यादीचा राग मनात धरून गणेश वानकर आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी शनिवारी (एक जुलै) फिर्यादी महिलेला घरात जाऊन सर्वांसमोर शिवीगाळ आणि दमदाटी केली. तसेच, उषा हब्बू यांच्या सूनबाईचा हातही पिरगळ्यात आलेला आहे. ‘माझ्या खडी क्रशरच्या गाड्यात आहेत. त्या गाडीच्या खाली घालून ठार मारेन’ अशी धमकीही दिल्याचे फर्यादीत उषा हब्बू यांनी म्हटलेले आहे.

अवैध दारुधंद्याला विरोध केल्यामुळेच ॲट्रोसिटी : गणेश वानकर

सोलापूर-बार्शी टोल नाक्याजवळील भोगाव हद्दीत अवैध दारूधंद्याला विरोध केल्यामुळेच माझ्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे, असे स्पष्टीकरण असे शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी दिले.

ज्या व्यक्तीने माझ्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे, ती व्यक्ती कोणत्या समाजाची आहे, हे आपल्याला माहितीसुद्धा नाही. संबंधित व्यक्ती रस्त्यावर अवैधरित्या बांधकाम करून विनापरवाना त्या जागेवर दारूचे दुकान थाटण्याचा प्रयत्न करत होती. याबाबतची लेखी तक्रार आपण सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि मंडलधिकारी (सर्कल) यांना दिलेली आहे. त्या तक्रारीचा राग मनात धरून यापूर्वीच संबंधिताने माझ्या दारूधंद्याला अडचण निर्माण केली तर मी तुमच्यावर ॲट्रोसिटी दाखल करणार आहे. घरातील महिलांना पुढे करून विनयभंग यासारख्या केसेस दाखल करणार आहे, अशी धमकी दिली होती, असेही वानकर यांनी सांगितले.

वानकर म्हणाले की, शिवसेनेचा जिल्हाप्रमुख असल्यामुळे तो माझा विभाग येतो. तेथील रहिवाशांचीसुद्धा तक्रार होती. अवैध दारूधंद्यामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. याबाबत तेथील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीतूनच आपण संबंधिताला रस्त्यावर अनधिकृत बांधकाम व दारू व्यवसायाला विरोध दर्शवला होता. मात्र, त्या व्यक्तीने कोणाचेही न ऐकतर अवैधरित्या सरकारी रस्त्यावरच रात्रीतून बांधकामाला सुरुवात केली होता. त्याला आपण विरोध केला. मागेसुद्धा आपणास त्याने ॲट्रॉसिटीची धमकी दिली होती. परंतु अशा धमक्यांना आपण जुमानणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT