- अमोल जाधव
Satara ZP Election : जिल्हा परिषदेचा रेठरे बुद्रुक गट हा कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले गटाचा बालेकिल्ला मानला जातो. या गटात विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद तुल्यबळ वाटत नसली तरी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर व कृष्णेचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी एकत्रित मोट बांधल्यास भोसलेंच्या बालेकिल्ल्यात हेच विरोधक आव्हान देऊ शकतात, अशी परिस्थिती आहे.
रेठरे बुद्रुक जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी, तर रेठरे बुद्रुक गण खुला, शेरे गण हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. डॉ. सुरेश भोसले व अविनाश मोहिते हे दोघेही पुढच्या वर्षी जूनमध्ये होणाऱ्या कृष्णा कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीतील डावपेच आखतील, असे चित्र आहे. अशावेळी तिन्ही ठिकाणी उमेदवारी देताना दोन्ही बाजूंनी अनपेक्षित उमेदवार येण्याची शक्यता आहे. या गटात रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, आटके, जाधवमळी, गोंदी, शेरे, शेणोली, जुळेवाडी व खुबी या गावांचा समावेश होतो.
रेठरे बुद्रुक जिल्हा परिषद गटावर आतापर्यंत (कै.) यशवंतराव मोहिते आणि जयवंतराव भोसले गटाच्या उमेदवाराला मतदारांनी आलटून-पालटून पसंती दिली आहे. मोहिते व भोसले १९८९ पासून विरोधक होते. २००७ नंतर या दोन्ही गटांतील विरोध मावळला. मात्र, २०१० मध्ये अविनाश मोहितेंसारखा पर्याय पुढे आला. २०१९ नंतर यशवंतराव मोहिते आणि जयवंतराव भोसले गटांमधील दुही संपुष्टात आली. पण आता पुन्हा भोसलेंच्या एकहाती सत्तेपुढे केवळ कृष्णेचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचा विरोध उरला आहे.
भोसलेंच्या गटात नेते ठरवतील, त्या उमेदवाराचा कार्यकर्त्यांना झेंडा हातात घ्यावा लागणार आहे, तर कारखान्याची निवडणूक व गटातील अंतर्गत कुरघड्या लक्षात घेऊन नेत्यांना रणनीती आखावी लागेल. आटके, शेरे व रेठरे खुर्द गावांत भोसले गटांतर्गत मोठी धुसफूस आहे. त्यावर नेत्यांनी वेळेत उपाय न केल्यास त्याचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो. दुसऱ्या बाजूस या गटात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अविनाश मोहिते व त्यांचा गट चार्ज आहे. त्यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व डॉ. इंद्रजित मोहिते, अजित पवारांची राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना कशी साथ देतात? हे पाहावे लागेल.
जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण आहे. भोसले गटातून त्यांच्या कुटुंबातील महिलेस संधी देणार का? याकडे लक्ष आहे. कुटुंबातील आदित्य ऊर्फ सुदन मोहितेंच्या पत्नीचा चेहरा भोसलेंकडून पुढे आणला जाणार, की सर्वसामान्य उमेदवार रिंगणात येणार? याची उत्सुकता आहे. तत्कालीन सभापती सुशीला साळुंखे यांच्या स्नुषा सारिका साळुंखे, माजी सदस्या शामबाला घोडके, माजी सरपंच सुवर्णा कापूरकर, संजीवनी कार्वेकर या ही इच्छुक आहेत. भोसलेंकडून भावकींचे समीकरण साधत धर्मे किंवा इतर लहान भावकीतील नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न असल्याचीही चर्चा आहे.
भोसले गटातून रेठरे बुद्रुक गणातून आटके गावात संधी दिल्यास महाराष्ट्र केसरी (कै.) पैलवान संजय पाटील यांचे बंधू पैलवान धनंजय पाटील यांचे नाव निश्चित मानले जाते; परंतु त्यांना गटांतर्गत विरोध होऊ शकतो. तेथे राजेश जाधव हे ही इच्छुक आहेत. तसे झाल्यास भोसलेंकडून रेठरे खुर्दला संधी मिळू शकते. तेथेही अंतर्गत कलह असून, तो सोडवणे महत्त्वाचा आहे. तेथून वैभव कळसेंना संधी मिळू शकते.
शेरे गणात भोसलेंसमोर मोठा पेच आहे. तेथे शेरे गावात उमेदवारी देण्याचा आजपर्यंतचा प्रघात आहे; परंतु या गावातील अंतर्गत कलह नेत्यांना मान्य नसल्याने शेणोली, जुळेवाडी, गोंदी व खुबी गावांत संधी दिली जाऊ शकते. शेरेतून माजी सदस्य बाळासाहेब निकम, माजी सरपंच पैलवान राहुल पाटील, शंकरराव निकम, समीर पाटील, पांडुरंग निकम, शशिकांत निकम, भाजपचे तालुकाध्यक्ष शंकर निकम, शेणोलीतून विक्रम कणसे, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील शामराव कणसे, अमोल पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष माणिकराव कणसे आदींच्या सौभाग्यवती इच्छुक आहेत.
विरोधी अविनाश मोहिते गटाकडून उमेदवारी ठरवताना महाविकासचे घटक पक्ष व ॲड. उदयसिंह पाटील - उंडाळकर यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न राहील. मोहितेंकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी रेठरे बुद्रुक सोडून इतर गावात देऊन पंचायत समितीसाठी शिवराज हेमंत मोहिते व कृष्णत चव्हाण - पाटील यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली आहेत. एक वेळच्या निवडणुकीत भोसले गटाने असा प्रयोग केला होता. असे झाल्यास शेरे किंवा आटके गावात जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे, तर शेरे पंचायत गणातून मोहिते यांच्याकडून नवखा उमेदवार आणला जाणार का? हेही पाहणे महत्त्वाचे आहे.
मोहितेंच्या गटातून जिल्हा परिषदेसाठी त्यांच्या पत्नी अर्चना मोहिते यांना उमेदवारी दिली जाऊ शकेल का? रेठरे बुद्रुक गणामधून रेठरे खुर्द येथील अरुण साळुंखे, आटके येथून पैलवान उदय पाटील व शेतकरी संघटनेचे बापूसाहेब साळुंखे यांच्या नावाची चर्चा आहे. शेरेतून अधिकराव निकम, शेणोलीतून दीपक कणसे यांच्या ‘सौं’ना उमेदवारी मिळू शकते. या गटात काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. तेथे काँग्रेसचे दिग्विजय ऊर्फ आबा सूर्यवंशी हेही गट अथवा गणासाठी इच्छुक आहेत.
गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपर्यंत यशवंतराव मोहिते गट कार्यरत होता. यावेळच्या निवडणुकीत या गटाच्या मदनराव मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांची भूमिका सर्वांनाच बुचकळ्यात टाकत आहे. नेत्यांच्या भूमिकेमुळे या गटाचे कार्यकर्तेही तटस्थ आहेत.
कऱ्हाड पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. रेठरे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील शेरे पंचायत समिती गणासाठी हेच आरक्षण आहे. त्यामुळे या पदाची संधी म्हणून या गणातून निवडून येणाऱ्या महिलेचा विचार होऊ शकतो, हे नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.