Solapur, 04 April : माझं डॉ बाबासाहेब देशमुख यांना सांगणं आहे. डॉ. अनिकेत देशमुख तुम्हीही नीट ऐका. आमदार कुठे आहेत. डॉ. बाबासाहेब तुम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात अजिबात येऊ नका आणि तुम्ही आले तरी आम्ही तुम्हाला घेतबी नाही. पण, तुम्ही या महिन्यात निर्णय घ्या आणि शेतकरी कामगार पक्ष हा शिवसेना-भाजपचा मित्रपक्ष झाला आहे, एवढी बातमी आम्हाला द्या. दंडवत घालत चिकमहूदहून (ता. सांगोला) तुमच्या घरी येतो. अगोदर बाईंचं दर्शन घेतो आणि तुम्ही लहान असला तरी तुमचं दर्शन घेतो, अशी थेट ऑफर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना दिली.
जयकुमार गोरे यांची सोलापूरच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल सांगोला तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्कार समारंभात बोलताना माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाला शिवसेना-भाजपसोबत येण्याचे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) त्यावर काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) म्हणाले, पाणी कधी सुटतंय, याची सर्वजण वाटत बघत होते. त्यात शेतकरी कमी होते. मात्र, नेतेमंडळी जास्त होते. पाणी मिळविणे एवढं सोप नाही. पाण्यासाठी माझं सारं आयुष्य गेलंय. पाण्यासाठी काय लागतं, हे मी तुम्हाला समजावून सांगतो. सर्वांत महत्वाचा मुद्दा सांगण्यासाठी उभा आहे. माझ्या मनाला एक गोष्ट चाटून गेली आहे. ज्या माणसाने सांगोल्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी गेली पाच वर्षे चांगल्या पद्धतीने काम केले, त्या खासदाराला तुम्ही बेस्टपैकी पाडून टाळ्या वाजवल्या. पाप मीबी केलंय. चांगलं कोण वागलं आणि पाप कोणी केली, हे ज्याच्या त्याला माहिती आहे. ज्याच्या त्याने आपापल्या आत्म्याला विचारायचे.
शहाजीबापू म्हणाले, असलं राजकारण आपण करायला लागलो तर एकट्या डॉ. बाबासाहेब देशमुखांना काय निवडून देताय. एकाच पंचवार्षिकला मला, डॉ. बाबासाहेब देशमुख, दीपकआबा साळुंखे आणि डॉ अनिकेत देशमुखांना निवडून दिलं, तरी तुमचं कल्याण होणार नाही. कारण घोडं कुठं पेंड खातंय हे मला माहिती आहे. काँग्रेस काय आपली शत्रू होती काय. माझं, जयाभाऊ आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं आयुष्य काँग्रेस पक्षातच गेलं आहे.
लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पाण्यासाठी जीवनभर लढा दिला. दऱ्याखोऱ्यातून फिरले पण काँग्रेसने कधीही त्यांच्या मागणीला साथ दिली नाही, पण शिवेसेनेतून खासदार झाले आणि राज्यात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले, त्यावेळीच टेंभू, म्हैसाळ, उजनीचे पाणी भाजप शिवसेना सरकारच्या काळात सांगोला तालुक्यासाठी मंजूर झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
शहाजीबापू पाटील म्हणाले, मधल्या काळात आपल्याला पाणी का दिलं नाही. कोण नव्हतं या ठिकाणी. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, बाळासाहेब देसाई, पंतगराव कदम अशी डोंगराएवढी माणसं या भागात होऊन गेली. पण, आपल्या दुष्काळाला भाजप आणि शिवसेना युतीने लावला, हे मी जाहीरपणे सांगतो. त्यामुळे कोणत्या राजकीय वाटा धरायच्या हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आरडून ओरडून प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी सत्ता लागते, हे यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या महान माणसाने सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.