Balasaheb Patil Speech Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Balasaheb Patil's Victory Speech : सह्याद्री कारखान्याची निवडणूक जिंकताच विरोधकांनी ‘हा’ डाव रचला होता; बाळासाहेब पाटलांचा विजयीसभेत मोठा गौप्यस्फोट

Sahyadri Sugar Factory Election Result : आम्ही निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुविधा पाहण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना बॅच दिला होता, मात्र विरोधकांनी त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा हकालून दिलं. ही कसली मस्ती. कोण काय बोललं, कोणी धमकी दिली, हे सर्व मला माहिती आहे, वेळ आल्यानंतर त्यांचा नक्की बंदोबस्त करण्यात येईल.

Vijaykumar Dudhale

Karad, 07 April : मला वाईट एका गोष्टीचं वाटतं. मी बरंच मनात ठेवतो, बोलून कधी दाखवत नाही. पण, आज बोलतो. विरोधकांची प्रवृत्ती ही तालिबानी आहे. त्यांची खासगीत चर्चा काय होती, तर सह्याद्री सहकारी साखर कारखाना ताब्यात घ्यायाचा, काही अधिकारी नेमायचे आणि पी. डी. पाटील यांचा पुतळा कारखाना परिसरातून काढायचा, असा विरोधकांचा डाव होता, असा खळबळजनक आरोप सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला.

कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनेलने २१-० असा धुव्वा उडवून विरोधातील भाजप आमदार मनोज घोरपडे-ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि काँग्रेस नेते निवास थोरात यांच्या पॅनेलाचा पराभव केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी हा आरोप केला.

बाळासाहेब पाटील म्हणाले, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला (Sahyadri Sugar Factory ) पन्नास वर्षे झाल्यानंतर आपण विस्तारवाढ, साखरेबाबत काही धोरणे ठरवली आहेत. विधानसभा निवडणुकीतील विजयी मिरवणूक कारखान्यासमोरील पुलावर आल्यानंतर सह्याद्री कारखाना आणि (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याकडे पाहून शड्डू ठोकण्यात आला.

पण, आपली ३२ हजार जणांशी लढत होते, हे विरोधक विसरले होते. आपण कोणासमोर उन्माद करतोय, हे ते विसरले. त्यामुळे अशा प्रवृत्तीचा वेळीच बंदोबस्त करणे आवश्यक आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून हे शक्य होणार आहे.

विरोधकांनी पी. डी. पाटील यांचा पुतळा कारखाना परिसरातून काढायचा, असे ठरविले होते. पण, त्यांना माहिती नाही. आम्ही दुःखात असताना सह्याद्री कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी पै पै गोळा करून पी. डी. पाटलांचा पुतळा उभा केला आहे. कराड नगरपरिषदेच्या आवारातही त्याच पद्धतीने पुतळा उभारला आहे.

कोणीही पैसे न मागता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने हे पुतळे उभारले आहेत. पी. डी. पाटील यांनी सगळे आयुष्य कराड शहर आणि कारखान्यासाठी खर्ची घातले आहे. याचा विचारही जनतेने केला पाहिजे, असे आवाहन पाटील यांनी केले.

अडचण काय आहे, ते शेवटपर्यंत सांगितलं नाही

कोणती प्रवृत्ती सातारा जिल्ह्यात वाढत आहे. मी मतदारसंघात म्हणत नाही. जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळींचा आपल्याला पाठिंबा आहे. काही लोकांनी गंमती केल्या असतील पण, आपल्याला सर्वांचा पाठिंबा मिळाला आहे.

काही लोकांनी कारखाना अडचणीत आहे, असं सांगितलं. पण अडचण काय आहे, हे त्यांनी सांगितलं असतं तर मी नक्कीच उत्तर दिलं असतं. पण, अडचण काही नसताना त्या मंडळींनी कारखाना अडचणीत आहे, म्हणून सांगितलं, असा टोलाही त्यांनी लगावला.

वेळ येताच त्यांचा नक्की बंदोबस्त करू

आम्हाला काय राजकारण कळतं नाही का? आम्ही काय बोळ्याने दूध पितो का? आम्ही संघर्ष करायला कुठे कमी पडणार नाही. सर्वांना बरोबर घेऊन आम्ही चांगलं काम करू. आम्ही जे वचन दिलं आहे, त्याची पूर्तता नक्की करू. सहकारातील ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार साखर कारखान्याचे कर्मचारी आणि अधिकारी हे निवडणुकीच्या काळात अधिकाऱ्यांच्या सोयीसुविधा पाहत असतात.

तसे आम्ही निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुविधा पाहण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना बॅच दिला होता, मात्र विरोधकांनी त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा हकालून दिलं. ही कसली मस्ती. कोण काय बोललं, कोणी धमकी दिली, हे सर्व मला माहिती आहे, वेळ आल्यानंतर त्यांचा नक्की बंदोबस्त करण्यात येईल, असा इशाराही बाळासाहेबांनी दिला.

एकानेही नाराजी दर्शविली नाही, हेच ठरले यशाचे गमक

राज्य आणि जिल्ह्यातील नेतेमंडळींनी सहकार्य केले आहे. तुमच्यावर ठपका ठेवावा, अशी कुठलीही परिस्थिती नाही, असे राज्यातील नेतेही सांगत होते. माघार घेतलेल्या एकानेही नाराजी व्यक्त केली नाही, उलट आपणच उमेदवार आहेत, असे समजून काम केले, त्यामुळे आपण एवढे मोठे यश मिळवू शकलो, असेही बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.

विधानसभेतील पराभव अमान्य

विधानसभा निवडणुकीतील पराभवाची आठवण करून देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणाचा संदर्भ देत तो पराभव ईव्हीएममुळे झाल्याचा अप्रत्यक्षपणे बाळासाहेब पाटील यांनी सूचित केले. विधानसभा निवडणुकीतील पराभव मान्य नव्हता; म्हणूनच कारखाना निवडणुकीतील विजयाचा एवढा मोठा जल्लोष कार्यकर्त्यांनी साजरा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT