Baramati Bypolls  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Baramati By Election : बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला; दिल्लीतून नाव जाहीर

congress announced candidate akash more for baramati byelection : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक होत असून काँग्रेसने उमेदवार निश्चित केला आहे.

Sudesh Mitkar

  1. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक होत आहे.

  2. काँग्रेसने बिनविरोध निवडणूक नाकारत आकाश मोरे यांना उमेदवार घोषित केले.

  3. मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार केसी वेणुगोपाल यांनी उमेदवारी जाहीर केली.

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. ही पोट निवडणूक बिनविरोध करावी यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात असतानाच काँग्रेसने मात्र कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवायची असा निर्णय घेतला. त्यानुसार आता उमेदवार निश्चित करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बारामती पोट निवडणूक लढणार नसेल तर काँग्रेस महायुतीच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे यापूर्वीच काँग्रेसने स्पष्ट केलं होतं. याबाबत दिल्लीतील नेत्यांची देखील परवानगी मिळाली असल्याचेही सांगितले होते. त्यामुळे आता बारामतीमधून काँग्रेसने उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे.

बारामती विधानसभा पोट निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरे यांची उमेदवारी निश्चित केली असून राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशाने केसी वेणू गोपाल यांनी याबाबतच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. यापूर्वी काँग्रेसकडून सहा जण इच्छुक असल्याचे समोर आले होते. या सहा जणांच्या इच्छुकांची यादी काँग्रेसने हाय कमांडकडे पाठवली होती. त्यातून मोरे यांच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

एकीकडे काँग्रेसने निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित केलं असताना दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. उद्या ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असून आपल्याला विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे सुरुवातीला लक्ष्मण हाके यांना काँग्रेस पाठिंबा दर्शवेल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच काँग्रेसने आकाश मोरे यांची उमेदवारी फायनल केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काय निर्णय घेणार याकडे देखील सर्वांचाच लक्ष लागलं आहे. ठाकरेंची शिवसेना बारामतीमधून उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात होतं.

मात्र सुनेत्रा पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली. त्यामुळे शेवटच्या क्षणी ठाकरे उमेदवार देणार? काँग्रेसला पाठिंबा देणार की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यादेखील उद्या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

FAQs :

1. बारामती पोटनिवडणूक का होत आहे?
अजित पवार यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणूक होत आहे.

2. काँग्रेसने कोणाला उमेदवारी दिली आहे?
काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे.

3. ही निवडणूक बिनविरोध होणार का?
नाही, काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने टक्कर होणार आहे.

4. उमेदवारीची घोषणा कोणी केली?
केसी वेणुगोपाल यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशाने घोषणा केली.

5. या निवडणुकीचे महत्त्व काय आहे?
बारामतीत मोठी राजकीय लढत होणार असून राज्याच्या राजकारणावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT