Solapur, 18 March : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गटातून विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे दीपक वैद्य, तर उपाध्यक्षपदी उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गटातून विजयी झालेले इंद्रजीत पवार यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या दोन्ही नावांची घोषणा केली. ही निवड सव्वा वर्षासाठी असणार आहे.
पालकमंत्री गोरे आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत शहरातील बालाजी सरोवर येथे बैठक झाली. त्या बैठकीत वैद्य आणि पवार यांची नावे निश्चित करण्यात आली. वैद्य यांच्या रुपाने बार्शी (Barshi) तालुक्यास 65 वर्षांनंतर प्रथमच जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले आहे. वैद्य आणि पवार यांनी अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत, विरोधी पक्षातील संख्याबळ पाहता त्यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या (Solapur Zill Parishad) 68 जागांपैकी भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 38 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळविला होता, त्यामुळे जिल्हा परिषदेचा भाजपचा पहिला अध्यक्ष कोण होणार, याची प्रचंड उत्सुकता होती. झेडपी अध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होते. त्यासाठी बार्शीचे दीपक वैद्य यांचे नाव निश्चित होते. मात्र, उपाध्यक्षपदाची उत्सुकता होती.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून धनगर समाजाला प्राधान्य दिल्यानंतर सामाजिक समतोल साधण्यासाठी उपाध्यक्षपदी मराठा समाजाचे इंद्रजीत पवार यांना संधी देण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबातील दीपक वैद्य हे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे कट्टर समर्थक आहेत.
वैद्य हे प्रथमच जिल्हा परिषदेवर निवडून आले असून त्यांना थेट अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. इतिहासात प्रथमच मिनी मंत्रालयाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी बार्शी तालुक्याकडे गेली आहे. त्याला माजी आमदार राऊत यांची बाजार समिती, नगरपालिका आणि त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील ‘शतप्रतिशत भाजप’ ही कामगिरी कारणीभूत ठरली आहे.
भाजपचे प्रांतिक सदस्य शहाजी पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावत उपाध्यक्षपद उत्तर सोलापूरकडे खेचून आणले आहे. पवार कुटुंंबाने पक्षासाठी आतापर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणून इंद्रजीत पवार यांना उपाध्यक्षपदाची संधी दिली आहे.
इंद्रजीत पवार हेही जिल्हा परिषदेवर प्रथमच निवडून आले असून त्यांनी उत्तर सोलापूर पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. पवार कुटुंबीयास राजकीय पार्श्वभूमी आहे. शहाजी पवार, इंद्रजीत पवार यांनी पडत्या काळात भारतीय जनता पक्षाचे काम केलेले आहे. त्याचीच फलश्रुती म्हणून इंद्रजीत पवार यांच्याकडे उपाध्यक्षपदही आले आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.