
Solapur, 14 June : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 32 जिल्हा परिषदांचे गट आणि 336 पंचायत समितीच्या गणांची प्रभाग रचना करण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने शुक्रवारी काढला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या 68 ही कायम राहिली असून मोहिते पाटील यांच्या माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेचे दोन गट आणि पंचायत समितीचे चार गण कमी झाले आहेत. ती घटलेली संख्या उत्तर सोलापूर आणि करमाळा तालुक्यात वाढली असून दोन्ही तालुक्यात जिल्हा परिषदेचे प्रत्येक एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत.
माळशिरस तालुक्यात (Malsiras Taluka) 2017 च्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 11 होती. मात्र, 2017 नंतर अकलूजला नगरपरिषद, तर नातेपुते आणि श्रीपूर महाळुंग येथे नगरपंचायत अस्तित्वात आली आहे. या ठिकाणी पूर्वी ग्रामपंचायती होत्या. तालुक्यात एक नगरपरिषद आणि दोन नगरपंचायती अस्तित्वात आल्याने नव्या प्रभाग रचनेत माळशिरस तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट कमी झाले आहेत.
माळशिरसमधील अकलूज आणि परिसरातील एक जिल्हा परिषद (Zillha Parishad) गट कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, नातेपुते परिसरातील एक गट कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेतील माळशिरसमधील दोन हक्काची मते कमी होणार आहेत, त्यामुळे आगामी राजकीय वाटचालीवर काय परिणाम होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
माळशिरसमधील जिल्हा परिषदेतील हक्काची दोन मते कमी झाली असली तरी नगरपंचायत आणि नगर परिषदेतील सदस्य संख्या वाढल्याने विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा फायदा तेथील सत्ताधाऱ्यांना होणार आहे. तो निश्चितच मोठा असणार आहे.
जिल्हा परिषदेच्या दोन गटांबरोबरच पंचायत समितीचे चार सदस्यही माळशिरसमधील कमी होणार आहेत. माळशिरसमधील कमी झालेली संख्या करमाळा आणि उत्तर सोलापूर या तालुक्यांत वाढणार आहे. या दोन्ही तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या दोन गटाबरोबरच पंचायत समितीचे चार गणही वाढणार आहेत, त्यामुळे या दोन्ही तालुक्यांची जिल्हा परिषदेत ताकद वाढणार आहे.
प्रभाग रचनेसाठी समिती
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची प्रभाग रचना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी, संबंधित तहसीलदार, संगणक तज्ज्ञ आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
हरकती अन् सुनावणी
प्रभाग रचनेवर जिल्हाधिकारी आणि संबंधित तहसीलदारांच्या कार्यालयात हरकती घेता येणार आहेत. प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या हरकतींवर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे, त्यानंतर जिल्हाधिकारी हे गट आणि गणाचे अंतिम प्रभाग जाहीर करणार आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभागांची प्रारूप यादी 14 जुलैपर्यंत प्रसिद्ध होणार आहे, त्यानंतर 21 जुलैपर्यंत हरकती आणि सूचना मागविल्या जाणार आहेत. विभागीय आयुक्तांकडे 11 ऑगस्टपर्यंत सुनावणी होणार असून अंतिम मान्यतेसाठी प्रभाग रचना 18 ऑगस्टपर्यंत सादर केली जाणार आहे.
झेडपी सदस्यांची तुलनात्मक संख्या
तालुका......... २०१७....................... २०२५
माळशिरस..........११......................... ०९
मोहोळ...............०६....................... ०६
पंढरपूर...............०८........................ ०८
सांगोला................०७......................... ०७
मंगळवेढा............. ०४....................... ०४
दक्षिण सोलापूर......... ०६.................... ०६
अक्कलकोट.............. ०६...................... ०६
करमाळा..................... ०५...................... ०६ (एकने वाढ)
माढा........................... ०७........................ ०७
बार्शी........................... ०६....................... ०६
उत्तर सोलापूर................ ०२ ......................०३ (एकने वाढ)
एकूण ............................६८....................... ६८
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.