Rajendra Raut Join Shivsena Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajendra Raut : आमदार राजेंद्र राऊतांना अवघ्या 18 दिवसांत बदलावा लागला निर्णय

Barshi Constituency : घडामोडीच अशा घडल्या की अवघ्या अठरा दिवसांत राऊत यांना आपला निर्णय बदलावा लागला. आमदार राजेंद्र राऊतांना आता शिवसेनेकडून निवडणूक लढवावी लागणार आहे. शिवसेनेकडून त्यांची उमेदवारी आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 28 October : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आज (ता. 28 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अपक्ष आमदार राऊत यांनी साधारणपणे पंधरा दिवसांपूर्वी विधानसभेची आगामी निवडणूक भाजपकडून लढविण्याची घोषणा केली होती. मात्र, घडामोडीच अशा घडल्या की अवघ्या अठरा दिवसांत राऊत यांना आपला निर्णय बदलावा लागला. आमदार राजेंद्र राऊतांना आता शिवसेनेकडून निवडणूक लढवावी लागणार आहे. शिवसेनेकडून त्यांची उमेदवारी आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. राऊत यांच्यासोबतच त्यांच्या काही समर्थकांनीही शिवसेनेत जाणे पसंत केले आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी राऊत यांच्या हाती शिवसेनेचा भगवा देत पक्षात स्वागत केले. राऊत यांच्या पक्षप्रवेशावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.

राजेंद्र राऊत यांनी मागील २०१९ मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाला (BJP) पाठिंबा दिला होता. गेली पाच वर्षे ते भाजपसोबत होते. या निवडणुकीत राऊत यांनी भारतीय जतना पक्षाकडून लढण्याचे जाहीर केले होते. कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय आमदार राजेंद्र राऊत यांनी १० ऑक्टोबर रोजी घेतला होता. मात्र, अवघ्या १८ दिवसांत राऊत यांना आपला निर्णय बदलावा लागला आहे.

महायुतीच्या जागा वाटपात घडामोडीच अशा घडल्या की, राऊत यांना आपल्या निर्णयापासून फारकत घ्यावी लागली आहे. भाजपकडून सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर उत्तर, पंढरपूर-मंगळवेढा या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. आणखी माळशिरस, करमाळा, माढ्याचा निर्णय बाकी आहे.

करमाळ्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला समर्थन दिलेले संजय शिंदे हे निवडणूक लढवत आहेत, तर माढा हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे केवळ माळशिरसची उमेदवारी जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे बार्शी मतदारसंघ हा शिवसेनेकडे गेला आहे.

बार्शी मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने राजेंद्र राऊत यांना भाजपकडून विधानसभा निवडणूक लढविण्याचा घोषित केलेला निर्णय बदलावा लागणार आहे. त्या अनुषंगानेच आज सकाळीच राऊत यांनी मुख्यमंंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना प्रवेशामुळे बार्शीतून राऊत यांच्या उमेदवारीचा मार्गही मोकळा झाला आहे.

शिवसेना प्रवेशानंतर आज राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीची घोषणा होऊ शकते. मूळचे शिवसेनेचे असलेले राजेंद्र राऊत यांचे पक्षांतराचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. राऊत यांनी १९९९ मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. पुढील २००४ च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर बाजी मारली होती. पुढे आमदार नारायण राणेंसोबत ते काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांनी २००९ ची निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढवली होती. मात्र, त्यात त्यांना अपयश आले होते.

पुढील २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश करूनही त्यांना निवडून येता आले नव्हते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. ते पक्ष लढले आणि जिंकलेही. सध्याच्या २०२४ ची निवडणूक त्यांनी भाजपकडून लढविण्याचे ठरविले होते. मात्र जागा वाटपात बार्शी मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने त्यांना आपला निर्णय बदलावा लागला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT