Vishal Phate
Vishal Phate  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विशाल फटेच्या लॉकरमध्ये दमडीही नाही!

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : बार्शी येथील विशाल फटे (Vishal phate) याच्या भगवंत सहकारी पतसंस्थेतील दोन्ही लॉकर्स आज (ता. २९ जानेवारी) उघडण्यात आले. परंतु, पोलिसांना त्या दोन्ही लॉकरमध्ये दमडीही सापडली नाही. दोन्ही लॉकर रिकामेच असल्याची बाब समोर आली आहे. (Barshi scam : Vishal phate's locker is empty)

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून जादा पैसे मिळतील, असे अमिष दाखवून विशाल फटे याने सुरवातीला लोकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त परतावा दिला आहे. लोकांचा विश्‍वास संपादन करून त्याने कोट्यवधी रुपये मिळविले आणि स्वत:साठी महागडी चारचाकी, दोन बंगले बांधले. पोलिस कोठडी मिळाल्यापासून पोलिसांनी केलेल्या तपासात त्याने किती पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतविले, यावर भाष्य केलेले नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. एका व्यक्‍तीकडून पैसे घ्यायचे आणि गरज असलेल्या दुसऱ्या व्यक्‍तीला द्यायचे, असेच व्यवहार अधिक केल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, त्याच्या भगवंत पतसंस्थेतील दोन्ही लॉकरमध्ये काहीतरी महत्त्वाची कागदपत्रे सापडतील, थोडीफार रक्‍कम असेल, असे पोलिसांना वाटत होते. साई सेक्‍युरिटी सर्व्हिसेसच्या तंत्रज्ञाला घेऊन पोलिसांनी पंच व फटेच्या समक्ष ते लॉकर उघडले. मात्र, त्यात काहीच सापडले नाही, दोन्ही लॉकर रिकामेच होते. त्यामुळे आता 127 तक्रारदारांचे जवळपास 29 कोटी रुपये त्याने नेमके कुठे गुंतवले, यादृष्टीने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधिक्षक संजय बोथे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत तो पोलिस कोठडीत असून त्याच्याकडून अधिक माहिती घेतली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

याचे पैसे घ्यायचे आणि त्याला द्यायचे

जादा पैशांचे अमिष दाखवून विशाल फटे याने लोकांना वेड्यात काढल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. लोकांकडून घेतलेली रक्‍कम कुठे-कुठे गुंतवली, याचे उत्तर सांगताना तो म्हणाला, याचे पैसे घ्यायचे आणि त्याला द्यायचे असेच केले. आतापर्यंत फटेविरुध्द 127 तक्रारी पुढे आल्या असून, शुक्रवारी (ता. 29) बार्शीतील एकाने 28 लाख 55 हजार रुपयाला फसविल्याची तक्रारी दिली. इतर तक्रारदारांची 24 कोटी 85 लाख 11 हजार 520 रुपयांची रक्‍कम त्याच्याकडे अडकली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT