Vijaykumar Deshmukh-Rajendra Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bazar Samiti Extension : देशमुख, राऊतांना मुदतवाढीचा बूस्टर डोस; निवडणुकीत आर्थिक केंद्र राहणार हाती

Solapur-Barshi News : सहकार आणि पणन विभागाने बाजार समितीच्या संचालकांना आणखी सहा महिन्यांची दुसरी मुदतवाढ दिली आहे.

प्रमोद बोडके

Solapur News : माजी मंत्री विजयकुमार देशमुख आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील बाजार समित्यांना राज्य सरकारकडून मुदतवाढीचा बोनस देण्यात आलेला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूरची आर्थिक वाहिनी असलेल्या बाजार समितीवर भाजपच्या देशमुखांचेच वर्चस्व राहणार आहे. बार्शीतही राऊतांचीच सत्ता निवडणुका होईपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Barshi, Solapur Bazar Committee extended till July)

सोलापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बार्शी बाजार समितीच्या संचालक मंडळास देण्यात आलेली पहिली सहा महिन्यांची मुदतवाढ जानेवारीमध्ये संपणार आहे. तत्पूर्वीच राज्याच्या सहकार आणि पणन विभागाने देशमुख आणि राऊत यांच्या नेतृत्वाखालील बाजार समितीच्या संचालकांना आणखी सहा महिन्यांची दुसरी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे येत्या जुलैपर्यंत निवडणूक होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सत्तेत असलेले आमदार विजयकुमार देशमुख आणि राजेंद्र राऊत यांनी बाजार समित्यांना मुदतवाढ मिळवून आपली ताकद दाखवून दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, करमाळा आणि सोलापू्र बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली होती. त्यातील करमाळ्याची निवडणूक झाली. त्यामुळे करमाळा बाजार समितीची निवडणूक होत असेल तर सोलापूर आणि बार्शीची का होत नाही? असा सवाल विचारला जात होता.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक व्हावी, यासाठी न्यायालयाच्या माध्यमातून प्रयत्न झाले होते. यापूर्वी मुदतवाढ देताना सहा महिने किंवा नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येईपर्यंत (यापैकी अगोदर जे घडेल ते) असा शेरा दिला होता. आज दिलेल्या मुदतवाढीत मात्र हा शेरा वगळण्यात आला आहे, त्यामुळे आता या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया आता होणार नाही, हे स्पष्ट होत आहे.

सोलापू्र बाजार समितीच्या संचालकांना १४ जुलैपर्यंत, तर बार्शी बाजार समितीच्या संचालकांना २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मात्र, ही मुदतवाढ देताना संचालकांनी कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे. धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर सरकारची मान्यता घेण्यात यावी, अशी घाट घालण्यात आली आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT