Sushilkumar Shinde-Sachin Kalyanshetti-Praniti Shinde-Veer Paharia  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : स्टॅन्डअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण; भाजप आमदारांचा सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप

standup comedian Praneet More Beating Case : प्रणित मोरे मारहाण प्रकरणात काँग्रेसच्या नेत्यांचा हात आहे की नाही, हे माहिती नाही. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांचा यात नक्की हात आहे. त्यामुळे अशा वृत्तीच्या लोकांच्या पाठीशी काँग्रेस नेत्यांनीही उभं राहू नये.

विश्वभूषण लिमये

Solapur, 06 February : स्टॅन्ड अप कॉमेडीयन प्रणित मोरे मारहाणप्रकरणी अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आक्रमक झाले आहेत. मोरे यांना मारहाण करणारे हे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोलापूरच्या पोलिस आयुक्तांना भेटून त्यांनी मोरे यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मोरे यांच्या मारहाणीवरून सोलापुरात भाजप विरोधात काँग्रेस वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचे नातू वीर पहारिया याच्यावर स्टॅन्ड अप कॉमेडीयन प्रणित मोरे यांनी विनोद केला होता. त्यामुळे चिडून काही लोकांनी मोरे यांना मारहाण केली होती. त्या प्रकरणी 10 जणांवर सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोरे मारहाणप्रकरणी आमदार कल्याणशेट्टी यांनी सोलापूर पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. सध्या सचिन कल्याणशेट्टी हे प्रणित मोरे यांच्या संपर्कात आहेत

आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) म्हणाले, सोलापूर हे कलाकरांना दाद देणारं शहर आहे. मात्र, एखाद्या कलाकाराशी मतभेद असतील तर त्याबाबत पोलिसांत जाणे अपेक्षित आहे. भारतीय राज्य घटनेने फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन आणि फ्रीडम ऑफ स्पीचचा सर्वांना अधिकार दिला आहे. पण, सध्या काँग्रेसवाले हे लोकशाहीचा गळा घोटला जातोय, असा बाऊ करत आहेत.

प्रणित मोरे मारहाण प्रकरणात काँग्रेसच्या नेत्यांचा हात आहे की नाही, हे माहिती नाही. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांचा यात नक्की हात आहे. त्यामुळे अशा वृत्तीच्या लोकांच्या पाठीशी काँग्रेस नेत्यांनीही उभं राहू नये. उलट पोलिसात जाऊन अशा लोकांवर कारवाई करण्याची त्यांनी ही मागणी करावी. काँग्रेसचे नेते हे जर खऱ्या अर्थाने मराठी कलाकारांच्या बाजूने असतील, तर अशा चेल्या चपाट्यांना पाठीशी घालणे थांबवावे, असे आवाहनही कल्याणशेट्टी यांनी केले आहे.

दरम्यान, तन्वीर शेख हा यामध्ये आरोपी आहे. तो सुशीलकुमार शिंदे यांचा पीए आहे की नाही, याबाबत मला माहिती नाही. तो कोणाचाही पीए असो किंवा कोणाच्या ही जवळचा असो अथवा नसो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे किंवा खासदार प्रणिती शिंदे यांचे ते निकटवर्तीय आहेत, एवढं मात्र समजतं. अशा लोकांच्या पाठीशी त्यांनी राहू नये, असाही सल्ला त्यांनी काँग्रेस नेत्यांना दिला.

सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, प्रणित मोरे मारहाण प्रकरणी पाच आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून बाकीच्या तीन आरोपीना पोलिसी खाक्या दाखवून ताब्यात घ्यावं, त्यामुळे पुन्हा अशा लोकांची कुणाला मारहाण करण्याची मस्ती होता काम नये.

पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं

सोलापुरातील एका हॉटेलमध्ये प्रणित मोरे यांचा कार्यक्रम सुरु असताना त्यांना मारहाण करण्यात आली होती. प्रणित मोरे हे स्वतः सोलापूरला येऊ न शकल्याने दूरध्वनीवरून पोलिसांनी त्यांचा जवाब नोंदवून घेतला आहे. मारहाण करणाऱ्या दहांपैकी आठ जणांची ओळख पटली असून पाच जणांना सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती सोलापूरचे पोलिस उपआयुक्त विजय कबाडे यांनी दिली.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT