पंढरपूर : देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (ता. ८ नोव्हेंबर) भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी तीन गोष्टी आशीर्वादाच्या माध्यमातून मागितल्या. त्यात त्यांनी पालखीमार्गालगत जे पायीमार्ग उभारण्यात येणार आहे, त्यालगत झाडे लावावीत. त्यासाठी या मार्गावरील गावांनी पुढाकार घ्यावा. दुसरी गोष्ट या मार्गावर ठिकठिकाणी जलकुंभ उभारून शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करावी आणि तिसरी गोष्ट भविष्यात पंढरपूरचा समावेश हा देशातील सर्वांत स्वच्छ तीर्थक्षेत्रामध्ये व्हावी, अशी अपेक्षा मोदी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. (Bhumi Pujan of Pandharpur Palkhi Marg hands of Prime Minister Narendra Modi)
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन सोमवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी राज्यपाल भगतसिंह कोशियारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.
मोदी यांनी ‘रामकृष्ण हरी,’ अशी मराठीत भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी केदारनाथाची पूजा करण्याची संधी मिळाली, तर आज पंढरपूरच्या पालखी मार्गाचे भूमिपूजन करण्याचे सौभाग्य मिळाले. यापेक्षा मोठे पुण्यकर्म काय असू शकते. पालखी मार्गाचे भूमिपूजन करताना मला अतिशय आनंद होत आहे. रस्ते हे विकासाचे द्वार असतात, पण, हे पालखी मार्ग हे पवित्र मार्गाकडे जाणारे महाद्वार ठरतील, अशी अपेक्षाही मोदी यांनी व्यक्त केली.
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तीन टप्प्यांत, तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पाच टप्प्यांत ३८४ कोटी रुपये खर्चून होणार आहे. याशिवाय पंढरपूरला राज्यभरातून येणाऱ्या पालखीमार्ग बनविण्यात आले आहेत. त्याचाही फायदा वारकऱ्यांना होणार आहे, त्यामुळे भविकांची संख्याही वाढणार आहे. अनेक कठीण प्रसंगातही विठ्ठलाची दिंडी अविरतपणे चालू राहिली आहे. ह्या पालखी सोहळ्याकडे जगातील सर्वांत मोठी यात्रा म्हणून पाहिले जाते. आषाढी यात्रेसाठी लाखो वारकरी ‘रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा-तुकोबांचा’ जयघोष करत येत असतात. तुकाराम महाराजांनी आपल्याला एक मंत्र दिला आहे की सर्व जग विष्णूमय आहे. एकमेकांमध्ये भेदाभेद, ईष्या नसावी, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळेच दिंडीत जातपात नसतो, भेदभाव नसतो. सर्व वारकरी समान असतात, ते एकमेकांचे भाऊ, बहिण असतात. ती विठ्ठलाची अपत्ये असतात. विठ्ठल हे सर्वांचे एकच गोत्र असते. ‘सबका विकास आणि सबकी साथ’ यामागेही संतांच्या शिकवणीची प्रेरणा आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधान म्हणाले की, पालखी सोहळ्यात पुरुषांबरोबर महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या असतात. हे एक समाजिक समरसता आणि स्त्री-पुरुष एकसमान दर्शविणारे आहे. ते एकमेकांना माऊली या नावाने हाक मारतात. महाराष्ट्रातील क्रांतीकारकांच्या यशस्वी वाटचालीमध्ये संतांचे मोठे योगदान आहे. वारकरी पंढरपुरात देवाला काही मागण्यासाठी येत नाहीत, तर फक्त दर्शनासाठी येतात. तेच त्यांचे ध्येय असते. म्हणूनच भक्त पुंडलिकाच्या सांगण्यावरून काही युगापासून भगवान विठ्ठल हे पंढरपुरात कडेवर हात ठेवून उभे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.