Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Thackeray Shiv Sena : एकाच दिवशी दोन पवारांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला डबल धक्का

उत्तम कुटे: सरकारनामा

Maharashtra Politics News : भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा माजी अध्यक्ष आणि प्रदेश सचिव एकनाथ पवार यांनी आज ठाकरे शिवसेनेत प्रवेश करीत भाजपला जोर का धक्का धीरे से दिला, तर आजच उद्योगनगरीतील भाजपचेच चेतन पवार यांनीही मातोश्रीवर मशाल हाती घेतली. त्यामुळे एकाच दिवसात भाजपला शहरात डबल झटका बसला आहे.

एकनाथ पवार हे भोसरी, तर चेतन पवार हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील असून, तेथे भाजपचे अनुक्रमे महेश लांडगे आणि अश्विनी जगताप आमदार आहेत. पक्षात येताच एकनाथ पवारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य संघटक म्हणून नेमले. तसेच ते तयारी करीत असलेल्या लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची त्यांना उमेदवारी देण्याचे आश्वासनही दिले. सत्ताधारी मंडळी विरोधी पक्षात येतात ही राजकारणातील अशक्य गोष्ट असून, त्यातही ज्या पक्षाकडे आज काहीच नाही अशा पक्षात येणं हे कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले.

सुलभा उबाळे पुन्हा अॅक्टिव्ह

भाजपच्या वरील दोन्ही पवारांच्या प्रवेशाच्या वेळी पक्षाच्या पिंपरी-चिंचवडमधील एकनिष्ठ पदाधिकारी, पुणे जिल्हा संघटिका (शिरूर) आणि पिंपरी महापालिकेतील माजी गटनेत्या सुलभा उबाळे आवर्जून उपस्थित होत्या. त्या पुन्हा अॅक्टिव्ह झाल्याच्या यानिमित्ताने दिसून आले. एकनाथ पवार यांनी प्रवेशापूर्वी त्यांना फोन करून शिवसेनेत येत असल्याचे सांगितले होते. त्यावेळीच त्यांचे स्वागत उबाळेंनी केले होते. पवार व उबाळे हे दोघेही यापूर्वी भोसरीतून विधानसभेला लढलेले आहेत. मात्र, या वेळी पवार हे गावी लोहा-कंधारमधून आमदारकी लढणार आहेत. तशी जोरदार तयारी त्यांची तिकडे गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. परिणामी या वेळी भोसरीतून इच्छुक असलेल्या उबाळेंना त्यांच्या प्रवेशामुळे काही अडचण होणार नाही. उलट पक्षबांधणीसाठी ताकदच मिळणार आहे.

दरम्यान, २०२२ ला भाजपमध्ये आलेले चेतन पवार या तरुण कार्यकर्त्याने अपेक्षाभंग झाल्याने पक्ष सोडल्याचे 'सरकारनामा'ला सांगितले. त्यांच्या ताथवडे भागातील समस्यांबाबत वारंवार मागणी पक्षाच्या नेत्यांकडे करूनही त्या सुटल्या नाहीत. तसेच मराठा आरक्षणाविषयी भाजप तेवढी सक्रिय दिसत नसल्याने आणि त्याबाबत उद्धव ठाकरेंची शैली चांगली वाटल्याने तिकडे गेलो, असे ते म्हणाले. २००९ ला ताथवडेचा समावेश पिंपरी महापालिकेत झाला. मात्र, अद्यापर्यंत तेथील जिल्हा परिषदेची शाळा ही महापालिकेकडे वर्ग झाली नसल्याचे एकच ज्वलंत उदाहरण त्यांनी वानगीदाखल दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT