Karad, 27 July : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा एकदा जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस पक्षाची समर्थक असलेल्या कऱ्हाड शहरातील जनशक्ती आघाडीतील जाधव गट भाजपच्या वाटवेर आहे.
या आघाडीने विधानसभा निवडणुकीत 2009 पासून काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जाधव गट काँग्रेस पक्षापासून दूर जाणे ही पक्षासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. यासाठी भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांच्या या राजकीय डावाने काँग्रेस आणखीन गलितगात्र होण्याची शक्यता आहे.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते वाठार येथे येत्या गुरुवारी (ता. 31 जुलै) पेट्रोल पंपाचे उद्घाटन होणार आहे. कऱ्हाड शहरात ताकद राखून असलेल्या जनशक्ती आघाडीचे (Janshakti Aghadi) अध्यक्ष अरूण जाधव, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव यांच्या या खासगी कार्यक्रमाला आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे जाधव गट भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
कऱ्हाड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे (Manoj Ghorpade) यांच्या पुढाकाराने परवा रात्री जनशक्ती आघाडीतील जाधव गटाबरोबर भाजप नेत्यांची एक बैठक झाली. त्या बैठकीतील अनेक गोष्टी अद्याप उघड झालेल्या नाहीत. मात्र, पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जाधव गट भाजप नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.
कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही राजकीय आखणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. जाधव गटाला आपल्यासोबत घेऊन भाजपने शहरात आपली पाळंमुळं आखणी घट्ट केली आहेत. दुसरीकडे काँग्रेसपुढील अडचणी आणखी वाढणार आहेत. नगरपलिका निवडणुकीत काँग्रेस (Congress) चारीमुंड्या चित करण्याची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे या घडामोडीतून स्पष्ट होत आहे.
जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून जाधव गटाच्या शारदा जाधव ह्या 2001 मध्ये जनतेमधून निवडून आलेल्या पहिल्या महिल्या नगराध्यक्षा आहेत. त्यानंतरही नगराध्यक्ष म्हणून त्यांना अडीच वर्षांचा कालवधी मिळाला होता. म्हणजेच जाधव यांनी साडेसात वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे. जनशक्ती आघाडी ही वेगवेगळ्या गटातील नेत्यांनी एकत्र येऊन उभारली आहे.
या आघाडीने आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिलेली आहे. त्यामुळे जाधव गटातील नेत्यांनी भाजपशी जवळकी वाढवली असली तरी आघाडीतील अन्य नेत्यांची भूमिका काय असणार, याकडेही सातारा जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.
जनशक्ती आघाडीची कराड शहर, उत्तर आणि दक्षिण या विधानसभा मतदारसंघात ताकद आहे. या आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी 2004 मध्ये कऱ्हाड उत्तर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी पराभव झाला होता. पुढे मतदारसंघ पुनर्रचनेत कऱ्हाड शहर हे कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघात गेले.
मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच्या 2009 मधील निवडणुकीत जनशक्ती आघाडीने ज्येष्ठ नेते (स्व.) विलासराव पाटील उंडाळकर यांना पाठिंबा दिला होता. पुढच्या तीन म्हणजेच 2014, 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना साथ दिली.
लोकसभा निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे महाविकास आघाडीचा प्रचार केला होता. काँग्रेस नेत्यांसोबत चांगले संबंध राखून असलेल्या आघाडीतील जाधव गटाने अचानक भाजपशी जवळीक साधल्याने त्याची मोठी चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.