Kolhapur News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज महाविकास आघाडीची खलबते होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरची जागा कोणत्या पक्षाला घ्यायची, इथपासून संभाव्य उमेदवार कोण असेल, यावर चर्चा शक्य आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी शरद पवार आज कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्यासह या कार्यक्रमाला खासदार डी. राजा, भालचंद्र कांगो, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरातही उपस्थित राहणार आहेत. (Loksabha Election-2024) Sharad Pawar Kolhapur Tour
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होत आहे. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून खासदार प्रा. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने विजयी झाले होते. सध्या हे दोन्ही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आहेत. त्यामुळे या तीनही पक्षांना नव्या चेहऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे. तत्पूर्वी जागा कोणाला याची निश्चिती व्हायला हवी. (political Marathi News )
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सद्यःस्थितीत दोन्ही जागांवर ठाकरे गटाकडून दावा सांगितला जात असला तरी त्यांच्याकडे दोन्ही मतदारसंघांत ताकदीचा उमेदवार नाही. अशीच स्थिती राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आहे. पण, जिल्ह्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तीन, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एक असे काँग्रेसचे चार आमदार आहेत. याशिवाय स्वतः सतेज पाटील व प्रा. जयंत आसगावकर काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आहेत, त्यामुळे काँग्रेसची बाजू भक्कम आहे. (India Aghadi)
कोल्हापुरातील दोनपैकी एक जागा काँग्रेसला सोडली जाण्याची शक्यता आहे. त्यातही कोल्हापूरमधून काँग्रेसची स्थिती मजबूत असल्याने हाच मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पवार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. स्मारक लोकार्पण सोहळ्यानंतर त्यांचा कोल्हापुरात मुक्काम आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मतदारसंघाचे वाटप व संभाव्य उमेदवारांच्या नावांवर या दौऱ्यात चर्चा अपेक्षित आहे. तशी तयारी त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे.
डिनर डिप्लोमसी
कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे आज सायंकाळी लोकार्पण झाल्यानंतर आमदार सतेज पाटील यांच्या घरी पवार यांच्यासह कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नेत्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम आहे. याच ठिकाणी जागावाटप, उमेदवारीवर चर्चा शक्य आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता पवार पुण्याला रवाना होणार आहेत, त्यामुळे उद्याच यावर चर्चा अपेक्षित आहे.
महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर होणार शिक्कामोर्तब?
राष्ट्रवादीच्या विभाजनापूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटीत यांच्याकडे महाविकास आघाडीचे जिल्ह्याचे नेतृत्व होते. पण मुश्रीफ यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीची जबाबदारी साहजिकच आमदार सतेज पाटील यांच्यावर राहिली आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या जागा कोणालाही मिळाली तरी महाविकास आघाडीची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावरच असणार आहे. शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आमदार सतेज पाटील यांच्या घरी महाविकासची बैठक होणार आहे. त्यातच नेतृत्व कोणाकडे राहील, यासंबंधी चर्चा होईल.
Edited By : Vijay Dudhale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.