Sadabhau Khot
Sadabhau Khot sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सांगोल्यातील घटनेमागे टोमॅटोसारखे गाल असलेला राष्ट्रवादीचा बडा नेता : सदाभाऊंचा आरोप

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : सांगोल्यातील (Sangola) प्रकारामागे टोमॅटोसारखे गाल असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बडा नेता आहे. राष्ट्रवादीच्या त्या बड्या नेत्याला या प्रकरणाचं फक्त व्हिडिओ शूटींग काढून व्हायरल करायचं होतं. पण, राष्ट्रवादीच्या या नेत्याला सांगतो की, अशा पद्धतीने षडयंत्र रचून सदाभाऊंचा आवाज दाबता आणि थांबवता येणार नाही, असे माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आज सोलापुरात बोलताना स्पष्ट केले. (Big NCP leader behind the Sangola incident : Sadabhau Khot)

सांगोल्यात आलेल्या सदाभाऊ खोत यांना अडवून अशोक शिनगारे या हॉटेलचालकाने ‘उधारी द्या आणि मगच पुढच्या दौऱ्यावर जावा’ अशी म्हणत त्यांच्या हुज्जत घातली. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिली असून सांगोला पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्या प्रकरणावर खोत यांनी आज सोलापुरात पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी वरील आरोप केला.

खोत म्हणाले की, राष्ट्रवादीकडून मला धमकावण्याचा, माझ्यावर हल्ला करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. सांगोल्यातील हॉटेलचालक अशोक शिनगारे हे गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. वाळूमाफिया आणि दारुविक्रीचा त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. तो सर्व चार्ट माझ्याकडे आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे. अशा बदमाश गुन्हेगाराला आमच्या अंगावर घालून कुभाड रचून आम्हाला जीवनातून उठविण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते मी कदापि यशस्वी होणार नाही.

राष्ट्रवादीच्या नेत्याचा अनेक एक वेगळा डाव होता, त्याचा मला सुगावा लागला. पण पोलिसांना का लागला नाही. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून ३५३ कलमानुसार गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र, रात्री नऊपर्यंत सांगोल्याचे पोलिस निरीक्षक गुन्हा दाखल करायला तयार नव्हते. मी सांगूनही पीआय गुन्हा दाखल करत नव्हते. तो चुकला आहे, माफी मागत आहे, त्यामुळे गुन्हा कशाला दाखल करायचा, असे पोलिस मला सांगत होते. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता, हेही पाहावे लागेल, असेही खोत म्हणाले.

रयत क्रांती संघटना अशा प्रकरणांचा निश्चितपणे मुकाबला करेल. येत्या २१ आणि २२ जून रोजी मुंबईत आमची राज्यव्यापी कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. आता संघर्ष अटळ आहे. हा संघर्ष राजकारणातील प्रस्थापित विरोध विस्थापित असा आहे. वाडा विरोध गावगाडा असा हा संघर्ष आहे. गावगाड्यातील माणसांना बरोबर घेऊन याचं जशास तसं उत्तर दिलं जाईल. गावगुंडांना समोर करू नका, तुमच्यात हिम्मत असेल तर समोरासमोर या. आम्ही कधीही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहे, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीला दिला.

हॉटेलचालक शिनगारे हे ब्रीफ केलेले आणि लिहून दिलेले तेवढंच बोलत होते. या प्रकारानंतर त्यांच्या गावातून मला फोन आले, तो गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराला माझ्या पुढे उभा करण्यात आलेले आहे, असे लक्षात आले. शिनगारे आणि पोलिसांचे फोन डिटेल्स काढा म्हणजे यामागे कोण आहे, ते कळेल, असेही खोत म्हणाले. मी २०१४ नंतर अनेकदा सांगोल्यात आलो, तेव्हा का मला पैसे मागितले नाहीत. तक्रारदार हॉटेलचाक मोठा गुन्हेगार आहे. यामागे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा हात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT