Prakash Ambedkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prakash Ambedkar : मोठी बातमी ! अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना 'एनडीए'मध्ये येण्याची केंद्रीय मंत्र्यांची ऑफर

Vishal Patil

Satara News: वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यावरून अनेक दिवस खलबतं सुरू होते. मुंबईतील बैठकीला प्रकाश आंबेडकरांनी हजेरी लावली असली तरी लोकसभेच्या जागेवरून एकमत झालेले नाही. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना ऑफर दिली आहे. 'वंचित'चे अॅड. आंबेडकर यांचा महाविकास आघाडी अपमान करत असून त्यांनी 'एनडीए'मध्ये यावे, त्यांचा सन्मान राखला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. (Ramdas Aathwale On Prakash Ambedkar)

सातारा येथील शासकीय विश्रामगह येथे माध्यमांशी रामदास आठवले यांनी संवाद साधला. यावेळी मंत्री आठवले म्हणाले, 'प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, महाविकास आघाडी त्यांचा अपमान करत आहे. प्रकाश आंबेडकर आमच्या समाजाचे मोठे नेते आहेत.

प्रकाश आंबेडकर यांना माझा सल्ला राहील, त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जावू नये. त्यांनी आमच्या सोबत यावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दलित आदिवासी समाजाला न्याय मिळत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मजबूत करण्याचं काम पंतप्रधानांनी केले आहे. त्यामुळे 'एनडीए'मध्ये प्रकाश आंबेडकरांनी यावं. त्यांचा सन्मान राखला जाईल, असं आठवले म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'लोकसभेला दोन जागा मागणार...'

लोकसभेचा एकही सदस्य नसताना पंतप्रधानांनी मला मंत्रिपदाची संधी दिली. देशभरातील दलित समाज मोठ्या संख्येने पंतप्रधानांसोबत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला एक किंवा दोन लोकसभेची जागा द्यावी, अशी मागणी बैठकीत करणार आहे. महाराष्ट्रातील गावागावात वस्ती-वस्तीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मते आहेत. त्यादृष्टीने महायुतीच्या नेत्यांनी विचार करणे गरजेचे आहे. मला संधी दिली आहे, तशीच संधी महाराष्ट्रातील माझ्या कार्यकर्त्यांना देणे गरजेचे आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर आपात्रेची टांगती तलवार होती. मात्र, आता सर्व काही क्लिअर झाले आहे. तेव्हा विस्तार लवकरात लवकर व्हावा आणि त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा समावेश असावा. 'एनडीए'मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सन्मान राखला गेला आहे. तसाच सन्मान महाराष्ट्रातही नक्कीच होईल,अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. 

'मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याचा दोष नाही..'

कल्याणमध्ये भाजपच्या आमदाराने फायरिंग केले असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिंदे यांचा कार्यकर्ता असल्याने ते दवाखान्यात गेले होते. या घटनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोष देण्याची गरज नाही. पोलिसांनी आपले काम केले असून संशयित आरोपींना ताब्यात घेतले असल्याचे मंत्री आठवले म्हणाले.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT