Satara, 17 February : सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या आहेत, मात्र, बहुमताचा आकडा सोबत नसतानाही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार, अशी भूमिका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतली आहे. या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सावध झाली आहे. त्यातूनच त्यांनी भाजपला प्रतिउत्तर देण्याची रणनीती आखली आहे. सत्तेच्या समीकरणासाठी सदस्यांच्या फोडाफोडीच्या धास्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सावध पवित्रा घेत आपल्या सदस्यांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे. शिवसेनेचेही सदस्य आजपासून (ता. 17 फेब्रुवारी) अज्ञातस्थळी रवाना होत आहेत.
स्वबळावर लढलेल्या भाजपला सातारा (Satara) जिल्हा परिषदेत २७ जागा जिंकता आलेल्या आहेत. बहुमतासाठी ३३ चा आकडा गाठण्यासाठी भाजपला आणखी सहा जागा आवश्यक आहेत, त्यामुळे साताऱ्यात सत्तेचा तिढा वाढत चालला आहे. निकाल लागून आठवडा झाला तरी सत्तेची गुंतागुंत सुटताना दिसत नाही.
निवडणुकीपूर्वी भाजपने शिवसेनेची फारकत घेत थेट विरोध केल्याने राजकीय रणांगण तापले होते. अशातच भाजपकडे (BJP) बहुमताचा आकडा नसतानाही अध्यक्षपदावर दावा केल्याने शिवसेनेची आणखीनच नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आज घडलेल्या घडामोडीने पडद्यामागील हालचाली वेगाने सुरू असल्याचे संकेत दिले आहेत.
गेल्या काही दिवसांतील भारतीय जनता पक्षातील वक्तव्ये लक्षात घेता राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे. त्यासाठीच पक्षाच्या सदस्यांची एकजूट लक्षात घेऊन राष्ट्रवादीने स्वपक्षाचे २० सदस्य, काँग्रेसचा एक, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सदस्य असे एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयात गटनोंदणी केली. त्यानंतर दुपारनंतर सर्व सदस्यांना अज्ञातस्थळी हलविण्यात आले आहे. त्यामुळे साताऱ्यात आगामी काळात झेडपीच्या सत्तेवरून महायुतीमधील तीन पक्षांमध्येच रण तापण्याची शक्यता आहे.
काँग्रेस, स्वाभिमानी राष्ट्रवादीचे सहयोगी
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे २० सदस्य, काँग्रेसचे एक, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक सदस्य असे एकूण २२ सदस्यांची एकत्रित नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीने सहयोगी गट म्हणून पाठिंबा दिला आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता करून गटनोंदणी करण्यात आल्याचे राष्ट्रवादीकडून सांगितले आहे.
सत्तेची समीकरणं बदलणार
सदस्य फोडाफोडीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे सदस्य अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले आहेत. शिवसेनेचेही सदस्य आज रात्री अज्ञातस्थळी जाणार आहेत, त्यामुळे शिवसेनेचेही सदस्य एकत्रित येत पक्षाच्या आदेशानुसार चालणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, भाजपला शिवसेनेची मदत घेतल्याशिवाय झेडपीची सत्ता स्थापन करणे अशक्य आहे. सद्य:स्थितीत राष्ट्रवादी व शिवसेनेचे सदस्य अज्ञातस्थळी गेल्याने सत्तेची समीकरणं बदलणार, हे निश्चित आहे.
सत्तेचा खेळ आता निर्णायक टप्प्यात
जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी राष्ट्रवादीने गटनोंदणी केली. त्यानंतर सदस्य स्वत:च्या वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गेल्याचे दिसून आले; परंतु सायंकाळनंतर अनेक सदस्यांचे फोन नॉट रिचेबल लागत होते. जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्यासाठी आणखी किती दिवस फोन नॉट रिचेबल लागतात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. एकूणच सध्या जिल्हा परिषदेत सत्तेचा खेळ आता निर्णायक टप्प्यात पोचल्याची चिन्हे दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.