BJP Latest Marathi News
BJP Latest Marathi News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

काँग्रेसने केलेली चूक भाजपने टाळली : विखेंच्या जागी दिली यांना 'शिर्डी'ची जबाबदारी

अमित आवारी

अहमदनगर - विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून भाजपमध्ये विखे कुटुंबा बाबत सुप्त नाराजी आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या आमदारांनी विखे यांच्या बाबत वरिष्ठांकडे तक्रार केली होती. भाजपची अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघांच्या जबाबदारी वाटपात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सतर्कता घेतली असल्याची चर्चा आहे. ( BJP avoids mistake made by Congress )

अहमदनगर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदार संघ येतात. यात शिर्डी व अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. यातील या दोन्ही लोकसभा मतदार संघावर विखे गटाचे प्रभुत्व आहे. शिर्डी मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. शिर्डी मतदार संघातून रामदास आठवले यांना पुन्हा उमेदवारी करण्याची इच्छा आहे. विखे भाजपमध्ये असताना 2009मध्ये झालेली चूक टाळण्यासाठी भाजपने शिर्डी लोकसभा मतदार संघाची जबाबदारी आमदार राहुल आहेर यांना दिल्याची चर्चा आहे.

आठवलेंचा पराभव का झाला

2009मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी राज्यात व देशात सत्तेवर होती. शिर्डी लोकसभा मतदार संघाची जागा राखीव झाली. त्यामुळे माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांना खासदारकीची निवडणूक लढण्यासाठी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची जागा हवी होती. मात्र ही जागा देण्यास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नकार दिला. कारण आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली होती. 1991च्या लोकसभा निवडणुकीनंतर विखे-गडाख संघर्षात शरद पवारांची राजकीय कारकिर्द उद्धवस्त होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे विखेंना अहमदनगर दक्षिणची उमेदवारीच मिळू दिली नाही.

त्यावेळी अहमदनगर दक्षिणमधून शिवाजीराव कर्डिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविली. त्यावेळी विखे गटाने भाजप उमेदवाराला ताकद देत निवडून आणले होते. शिर्डीतून काँग्रेसच्या कोट्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांना उमेदवारी मिळवून देण्यात शरद पवार यांनी भूमिका बजावली. काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी विखेंवर शिर्डी लोकसभा मतदास संघाची जबाबदारी टाकली. आठवले यांनी अॅट्रासिटी बाबत घेतलेल्या भूमिकांचे कारण पुढे करत विखे गटानेच रामदास आठवले यांचा पराभव घडून आणल्याचे सांगितले जाते. या पराभवानंतर आठवलेही हळूहळू काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावले. भाजपच्या गोटात सहभागी झाले. विखेही मागील तीन वर्षांपासून भाजपमध्ये आहेत.

आठवलेंना करायची उमेदवारी

रामदास आठवले यांना पुन्हा अहमदनगर दक्षिणमधून उमेदवारी करण्याची तयारी सुरू केली आहे. आठवले हे ज्या केंद्रातील सामाजिक न्याय विभागात राज्यमंत्री आहेत, त्या विभागाकडून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना मोठ्या प्रमाणात वयोश्री योजनेसाठी निधी दिला जात आहे. त्यातून हजारो वृद्धांना डॉ. सुजय विखे पाटील यांनी मदत केली आहे. आठवले आता विखेंशी जुळवून घेताना दिसत आहेत. विखेंच्या वयोश्री योजनेच्या कार्यक्रमांतही ते दिसले. त्यांनी बोटा ( ता. संगमनेर ) येथील कार्यक्रमात पुन्हा एकदा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली. आठवलेंना विजयासाठी विखेंचा पाठिंबा हवा आहे. कारण विखे गट काय करू शकतो हे त्यांनी पाहिले होते. त्यामुळे विखे गट काय करू शकतो, याचा कुणालाही 'नेम' नाही.

भाजपचा सावध पवित्रा

शिर्डीतून सदाशिव लोखंडे हे जरी शिवसेनेचे खासदार असले तरी ते मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांनी भाजपच्या तिकीटावर कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली. यातील पहिल्या प्रयत्नाचा अपवाद वगळता उर्वरित तीन वेळा भाजपचे आमदार होते. जागा वाटपात शिवसेनेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ मिळाला होता. त्यांच्याकडे अनुसूचित जातीचा उमेदवार निवडणुकीच्या 15 दिवस आधी पक्ष सोडून गेल्याने भाजपचे सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत खासदार झाले. आता सलग दोन वेळा ते खासदार आहेत. ते केव्हाही भाजपमध्ये पुन्हा येऊ शकतात, अशी चर्चा आहे. भाजपच्या कार्यक्रमांत शिवसेनेचे लोखंडे दिसतात. तर विखे पिता-पुत्राचे मागील आठवड्यांतील वक्तव्ये पाहता भाजप सध्या सावध पवित्र्यात आहे.

विखे व पवारांची जवळीक

खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे दोन महिन्यांपूर्वी कोपरगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी व्यासपीठावर कानगोष्टी करताना दिसले. सरकारनामाच्या विशेष मुलाखतीत डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार रोहित पवार हे माझे शत्रू नाहीत. मी पार्थ पवार यांना अनौपचारिक भेटतो, हे कबूल केले होते. मागील आठवड्यात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही विखे-पवार वाद हा वैयक्तिक नाही. एकत्रित बसून वाद सोडविण्याबाबत सांगितले होते. त्यामुळे विखे गटाची पवार कुटुंबाबाबतची भूमिका बदलत असल्याची चिन्हे आहेत. विखे गटाला कोणताही पक्ष वर्ज नाही. 2019च्या विधानसभा निवडणुकीत आमदार मोनिका राजळे वगळता अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे तत्कालीन आमदारांना पराभूत व्हावे लागले. या पराभवाचे खापर आमदारांनी विखे गटावर फोडत वरिष्ठांकडे तक्रार केली होती. विश्व हिंदू परिषदेनेही एका प्रकरणात विखे कुटुंबाबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने शिर्डी लोकसभा मतदार संघाची जबाबदारी राहुल आहेर यांच्याकडे सोपविली असल्याची चर्चा आहे.

विखेंची खेळी

राहुल आहेर यांची नियुक्ती झाल्याने शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या जबाबदारीतून विखे गट मुक्त झाला आहे. विखे गटाचे कार्यकर्ते सर्वच पक्षात आहेत. पारनेर तालुक्या प्रमाणेच इतरही काही तालुक्यात विखे गटाचे कार्यकर्ते एकत्रित करत जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्यासाठी विखे गट ताकद लावताना दिसण्याची चिन्हे आहेत. पारनेर तालुक्यात भाजप, शिवसेना व काँग्रेस अशी तीन पक्षांची मोट बांधण्याची तयारीही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे. असाच प्रयोग जिल्ह्यातील इतर ठिकाणीही दिसू शकतो, अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT