Shahaji Patil-Amit Shah-Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahajibapu Patil : शहाजीबापूंचा भाजपवर पलटवार; ‘आम्ही आमदारकी पणाला लावत गुवाहाटीला गेलो; म्हणून’

Amit Shah's Alleged Statement : भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्याग केला आहे. हे खरे आहे. पण, आम्ही धाडस केले. आम्ही आमदारकी पणाला लावून गुवाहाटीला गेलो; म्हणून भारतीय जनता पक्ष सत्तेत आला.

Vijaykumar Dudhale

Solapur, 17 October : विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर महायुतीमध्ये विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत कुरबुरी वाढल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान त्याला कारणीभूत ठरले आहे. भाजपकडे शंभरपेक्षा जास्त आमदार असताना पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला आहे. त्याला ‘काय डोंगार, काय झाडी’ फेम सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युतर दिले आहे. आम्ही आमदारकी पणाला लावून गुवाहाटीला गेलो; म्हणून भाजप सत्तेत आला, असा पलटवार त्यांनी भाजपवर केला आहे.

महायुतीमधील जागा वाटपाबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भाजपच्या त्यागाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आठवण करून दिल्याची चर्चा आहे. त्यावर आमदार शहाजी पाटील यांनी शिवसेना आमदारांच्या धाडसामुळे भाजप सत्तेत आला. अशी उलट आठवण भाजपा नेत्यांनी करून दिली.

भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठी त्याग केला आहे. हे खरे आहे. पण, आम्ही धाडस केले. आम्ही आमदारकी पणाला लावून गुवाहाटीला गेलो; म्हणून भारतीय जनता पक्ष सत्तेत आला. आम्ही धाडस केले नसते, तर भाजपच्या त्यागाचे काय महत्व होते, असा सवाल शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उपस्थित केला.

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. जरांगे पाटील यांना पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सकारात्मक चर्चा झाली असेल, असा विश्वासही आमदार शहाजी पाटील यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली यावरून टीका केली. त्यावरही आमदार पाटील यांनी उत्तर दिले आहे. न्याय हा उघड्या डोळ्यांनी करायचा असतो. न्याययदेवतेच्या हातात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान देण्यात आले आहे, असे सांगत शहाजीबापू यांनी राऊतांना उत्तर दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे माझे सहकारी आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असला तरी त्यावर माझा विश्वास नाही. आमच्या कोणतेही मतभेद नाहीत. निवडणूक काळात आम्ही एका गाडीत असू असं सांगत दीपक साळुंखे हे माझ्या सोबतच राहतील, असा विश्वासही आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT