Solapur MLC Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur MLC Election : भाजपचा 500 पारचा नारा; तर पवारांच्या राष्ट्रवादीचा 318 मतांचा दावा

BJP Vs NCP SP : सोलापूर विधान परिषद निवडणुकीनंतर मतांच्या गणितावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख दोघांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Vijaykumar Dudhale

Solapur, 20 June : सोलापुरात विधान परिषदेच्या आखाड्यात भाजपचे राजेंद्र राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांनी चॅलेंज दिले आहे. विधान परिषदेसाठी ९९.६८ टक्के मतदान झाल्यानंतर आता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मतांचे दावे केले जात आहेत. भाजप व मित्रपक्षांकडून राऊतांना ५०० पेक्षा मते मिळतील, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ३१० ते ३१८ मतांचे गणित जुळविले जात आहे, त्यामुळे येत्या सोमवारी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतदानात ६१६ मतदारांपैकी ६१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. एका नगरसेवकाचा मृत्यू झाला असून स्वीकृत नगरसेवक अमेरिकेत असल्यामुळे दोघांचे मतदान होऊ शकले नव्हते. मात्र उर्वरीत ६१४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.

मतमोजणी येत्या सोमवारी (ता. २२ जून) सकाळी आठपासून सोलापूर शहरातील नियोजन भवन येथे होणार आहे. निकालासाठी एक दिवस बाकी असला तरी आकड्यांचा हिशेब दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मांडत आहेत.

भाजप आणि महायुतीमधील मित्रपक्षांकडे बहुमतांपेक्षा जादा आकडे आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तीन, शेकापच्या एका आमदारानेही भाजपला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे राजेंद्र राऊत यांचे पारडे जड आहे. त्यानंतरही भाजपने लावलेल्या विशेष यंत्रणेमुळे निकालाची उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीतील मतपत्रिकांच्या पेट्या सध्या सोलापुरातील नियोजन भवनातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. या मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी राज्य राखीव पोलिसांचे २७ जवान आणि ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. स्ट्राँग रुमच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांचा जागता पहारा

दरम्यान, स्ट्राँग रुमच्या देखरेखीसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रतिनिधींना २४ तास उपस्थित राहण्याची संधी दिली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार देशमुख यांच्या कासेगाव (ता. पंढरपूर) येथील कार्यकर्ते तसेच भाजप कार्यकर्तेही या ठिकाणी उपस्थित आहेत.

सकाळी अकरापर्यंत निकाल जाहीर होणार

सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात वैध व अवैध मते वेगळी केली जाणार आहेत. त्यानंतर चार टेबलवर मतमोजणीला सुरुवात होईल. दोन फेऱ्यांत ही मतमोजणी होणार आहे. साधारणतः सकाळी अकरापर्यंत निकाल जाहीर होईल, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली.

मोहिते पाटलांची व्यूहरचना

विधान परिषद निवडणुकीत आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे मतदारांना मान-सन्मान मिळाला. आम्ही मतदारांना चार ते पाच वेळा भेटलो आहे. आम्ही ३१० ते ३१८ मते खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या व्यूहरचनेमुळे मिळणार, असा विश्वास राष्ट्रवादीकडून बोलून दाखवला जात आहे.

पालकमंत्री गोरेंची रणनीती

भाजपने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आखलेली रणनीती यशस्वी ठरली आहे. महायुतीमधील मित्रपक्षांच्या मदतीने आम्ही ५०० मतांचा आकडा पार करू, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT