BJP
BJP sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजपचा उमेदवार ठरला; कोल्हापूर उत्तरमधून सत्यजित कदम निवडणूक लढवणार!

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून (bjp) सत्यजित ऊर्फ नाना कदम यांची उमेदवारी आज (ता. ३ फेब्रुवारी) निश्चित झाली आहे. पुढील दोन दिवसांत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) करणार आहेत. दरम्यान, सत्यजित कदम यांच्याकडून वेगवेगळ्या भागातील नेते-कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी घेणे सुरू आहे. (BJP confirms Satyajit Kadam's candidature for Kolhapur North by-election)

विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव निवडून आले होते. मात्र, १ डिसेंबर २०२१ रोजी त्यांचे निधन झाले, त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर होणार, हे निश्चित आहे. त्यामुळे महिनाभरापासून या संदर्भातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

(स्व.) चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना भाजपकडून निवडणूक लढवण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. मात्र, त्यांनी या प्रस्तावाला नकार दिला आहे. आपले पती काँग्रेसचे आमदार होते, त्यामुळे आपण काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यानंतर भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.

प्रदेश भाजपने जिल्हा स्तरावरून उमेदवारांच्या नावांची यादी मागवली आहे. यामध्ये देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक सत्यजित ऊर्फ नाना कदम, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माणिक पाटील (चुयेकर) यांची नावे कोल्हापूर भाजपकडून पाठवण्यात आली आहेत. यातील सत्यजित कदम यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

सत्यजित कदम हे कदमवाडी परिसरातून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी काँग्रेसकडून २०१४ मध्ये निवडणूक लढवली होती, त्यावेळी त्यांना ४५ हजार मते मिळाली होती. पुढील दोन दिवसांत त्यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करणार आहेत. दरम्यान, कदम यांनी प्रचाराची तयारी सुरू केली असून त्यांनी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT