Solapur Congress : भाजपच्या नवख्या उमेदवारांनी सोलापूर हा सुशीलकुमार शिंदे यांचा गड २०१४ आणि २०१९ मध्ये काबीज केला. आता २०२४ मध्ये असा प्रश्न असतानाचा भाजपने मोठा डाव टाकत अजित पवारांना आपल्या तंबूत ओढत लोकसभा निवडणूक सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील किमान लाखभर मताची बेगमी अजित पवार यांच्यामुळे भाजपने केली आहे. कर्नाटकातील विजयानंतर जोशात असलेल्या काँग्रेस नेत्यांना जमिनीवर आणणारी ही घटना आहे. तसेच, सोलापूर शहर उत्तर, मोहोळ आणि पंढरपूर-मंगळवेढा या विधानसभा मतदार संघात बूथ चालवायला तरी काँग्रेसकडे कार्यकर्ते आहेत का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (BJP in plus in Solapur due to alliance with Ajit Pawar)
लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे सध्या मोदींची हवा नाही, हे मान्यच करावे लागेल. तसेच २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तिरंगी लढतीत एक लाख ७० हजार मते घेतली होती. त्यामुळे भाजपच्या जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा विजय झाला होता. आता २०२४ मध्ये ही १ लाख ७० हजार मते कुठे जाणार आणि पुढे काय असा प्रश्न असताना भाजपने (BJP) अजितदादांना (Ajit Pawar) सोबत घेऊन तो प्रश्न सोडविला आहे. तत्पूर्वी उदयशंकर पाटील यांनाही सोबत घेत तो प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील अजित पवारांसोबत महायुतीत गेल्याने मोहोळ वनसाईड झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
लोकसभेची आगामी निवडणूक आपण लढवणार नाही. प्रणिती शिंदे (Praniti Shinde) २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवतील, असे स्पष्ट संकेत सुशीलकुमार शिंदे (sushilkumar shinde) यांनी दिले आहेत. मात्र, शेवटच्या क्षणी ते निवडणूक लढविण्यास तयार होतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनीही ‘वेट आणि वॉटच’ची भूमिका घेतलेली दिसून येत आहे.
काँग्रेसला २०१४ पासून अनेक नेते सोडून गेले. त्यात माजी आमदार दिलीप माने, पंढरपूरचे भालके परिवार, माजी महापौर महेश कोठे, माजी नगरसेवक तौफिक शेख यांचा प्रामुख्याने सामावेश आहे. पण, काँग्रेसने पर्यायाने सुशीलकुमार शिंदे यांनी कोणत्या लोकनेत्याला पक्षासोबत जोडले, असाही प्रश्न आहे. सोलापूर लोकसभा निवडून आणण्याची सर्व जबाबदारी आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि सोलापूर जिल्हा बॅंकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्यावर असणार आहे.
आमदार प्रणिती शिंदे निवडून येतात, त्याच सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे हे मागील २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत पिछाडीवर होते. त्याचा उलगडा भल्याभल्यांना झालेला नाही. सिद्धाराम म्हेत्रे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यात निर्माण झालेला दुरावा संपलेला आहे की नाही?, सुरेश हसापुरेंचे पुढे काय, असे अनेक प्रश्न आहेत.
खासदार महास्वामींची पुन्हा तयारी
बनावट जात प्रमाणपत्र (बेडा जंगम) प्रकरणी सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याविरोधात जात प्रमाणपत्र पडताळी समितीने फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्या निर्णयाविरोधात महास्वामींनी न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण समितीकडे पाठवून महास्वामी यांची बाजू आणि त्यांच्याकडील पुरावे पाहून सहा महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश दिलेला आहे. पण, महास्वामी यांनी २०२४ ची निवडणूक पुन्हा लढविण्याची तयारी सुरू केलेली आहे.
अभिजीत पाटील, महेश कोठेंची भूमिका महत्वाची
पंढरपुरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील आणि सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे राष्ट्रवादीचे ताकदवार नेते सोलापूर लोकसभा मतदार संघात येतात. ते सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी लढवत नाही. त्यामुळे अभिजीत पाटील आणि कोठे यांना कोण जवळचे वाटणार, यावर बरेच काही अवलंबून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.