Ranjitsinh Mohite Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ranjitsinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपकडून शिस्तभंगाची नोटीस...

BJP issues Disciplinary Notice : रणजितसिंह मोहिते पाटील यांना आठ मुद्यांवर शिस्तभंग केल्यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे. त्यावर येत्या सात दिवसांत खुलासा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यावर रणजितसिंह मोहिते पाटील काय उत्तर देतात, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 17 December : माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारापासून लांब राहिलेले भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. माळशिरस मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात पक्षाकडे तक्रार केली होती, त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाने मोहिते पाटील यांना ही नोटीस बजावली आहे.

भाजपचे प्रदेश कार्यालयीन सचिव मुंकुद कुलकर्णी यांच्या सहीने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांना ही कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील यांना आठ मुद्यांवर शिस्तभंग केल्यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे. त्यावर येत्या सात दिवसांत खुलासा करण्याचे आवाहन मोहिते पाटील यांना करण्यात आले आहे. त्यावर रणजितसिंह मोहिते पाटील काय उत्तर देतात, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Show cause notice

लोकसभा निवडणुकीत माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना डावलून भाजपने (BJP) रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकिट दिले होते. तेव्हापासून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपपासून लांब होते. विशेष म्हणजे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपासूनही ते लांब राहिले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यात झालेल्या भाजप प्रदेश अधिवेशनाला मात्र त्यांनी हजेरी लावली होती.

लोकसभा निवडणुकीनंतर अकलूजमध्ये झालेल्या महाविकास आघाडीतील खासदारांच्या सत्कार समारंभाला ही रणजितसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती होती. त्या व्यासपीठावरून त्यांनी सोलापूरच्या विकासासाठी आपण कोणतीही तडजोड करायला तयार आहे, असे जाहीर विधान केले होते. त्यामुळे मोहिते पाटील यांच्या विरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून तक्रारी झाल्या होत्या.

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राम सातपुते यांनाच पुन्हा माळशिरसच्या मैदानात उतरवले होते. मात्र, राम सातपुते यांच्या सभांनाही रणजितसिंह मोहिते पाटील यांनी हजेरी लावली नव्हती. विधानसा निवडणुकीत राम सातपुते यांचा पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. मोहिते पाटील यांची भाजपतून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली होती.

राम सातपुते यांच्या मागणीनुसार भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही मोहिते पाटील यांच्या विरोधात भाजपच्या हायकमांडकडे तक्रार केली होती. आमदार श्रीकांत भारतीय यांनीही मोहिते पाटील यांच्यावर कारवाई होईल, असे पंढरपूर दौऱ्यावर आल्यानंतर सांगितले होते. त्यामुळे मोहिते पाटील यांच्यावर भाजपकडून कारवाई होणार का, याची उत्सुकता वाढली होती. मात्र, भाजपनेही थेट कारवाई न करता रणजितसिंह मोहिते पाटील यांना प्रथम कारणे दाखवा नोटीस पाठवून आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे.

नोटिशीत रणजितसिंह मोहिते पाटलांना याबाबतची केली विचारणा

१) पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माळशिरस येथे झालेल्या सभांना आपली अनुपस्थिती होती.

२) लोकसभा निवडणुकीत आपल्या परिवाराने भाजपच्या विरोधात काम केल्याचे निदर्शनास आले.

३) आपल्या परिवारातील सदस्यांनी पत्रकार परिषदेत माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या जागा पाडण्यासंदर्भात जाहीर व्यक्तव्य केले.

४) आपल्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या बूथ प्रमुखांना धमकावणे, पोलिंग एजंट मिळू न देणे, असे प्रकार केल्याचे निर्दशनास आले

५) लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमदेवाराची गळाभेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला भाजपविरोधी मतदान करण्यास प्रवृत्त केल्याचे निदर्शनास आले.

६) विधानसभा निवडणुकीत आपल्या परिवारातील सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मफलर गळ्यात घालून भाजपविरोधी काम केल्याचे निदर्शनास आले.

७) महाराष्ट्र सरकारने ज्या शंकर सहकारी साखर कारखान्यास आर्थिक मदत केली, त्या कारखान्यातील चिटबॉयकडून आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला. तसेच, साखर कारखान्याच्या सिव्हिल विभागातील कर्मचाऱ्यांकडून सदाशिवनगर येथील रहिवाशांच्या घरोघरी जाऊन राष्ट्रवादी उमेदवारास मतदान करण्यास भाग पाडल्याचे निर्दशनास आले आहे.

८) पोलिंग एजंटाला आपल्या कार्यकर्त्यांकडून मारहण झाल्याचे निदर्शनास आले

अशा आठ मुद्यांवर रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून विचारणा करण्यात आली आहे. यावर येत्या सात दिवसांत लेखी स्पष्टीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT