Sangli News : आगामी निवडणुका आणि 100 टक्के कमळ मिशनतंर्गत भाजपने राज्यात सदस्य नोंदणी अभियान हाती घेतले आहे. सध्या हे अभियान राज्यभर जोरात सुरू असून मुंबईसह प्रत्येक जिल्ह्यात सदस्य नोंदणीला जोर आला आहे. भाजपने पश्चिम महाराष्ट्रात देखील हे अभियान सुरू केले असून सांगली जिल्ह्यात सध्या याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे रोहित पाटील यांच्यासह विश्वजीत कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघ असून यापैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात सुधीर गाडगीळ, मिरज विधानसभा मतदारसंघात सुरेश खाडे, शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुख आणि जत विधानसभा मतदारसंघात गोपीचंद पडळकर यांनी बाजी मारली आहे.
भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानातंर्गत सांगली जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागाला लक्ष देण्यात आले आहे. ज्यात सांगली शहरात 1 लाख 24 हजार 400 सदस्य नोंदणीचे लक्ष आहे. तर 29 जानेवारी 2025 पर्यंत 67 हजार 723 प्राथमिक सदस्य म्हणून नोंद झाली आहे. ग्रामीण भागात देखील 1860 बुथवर आतापर्यंत 1 लाख 18 हजार 392 प्राथमिक सदस्य म्हणून नोंद झाली आहे. तर सांगली ग्रामीणसाठी 3 लाख 72 हजार सदस्य नोंदणीचे लक्ष्य देण्यात आले आहे.
सध्या या चारही मतदारसंघात सदस्य नोंदणीचे काम जोरात सुरू असून सांगली मतदारसंघात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वात 315 बुथवर नोंदणीचे काम केले जात आहे. येथे 63 हजार सदस्य करण्याचे लक्ष्य देण्यात आले असून सर्वाधिक सदस्य नोंदणी झाली आहे. 39 हजार 697 सदस्य नोंदणी येथे झाली आहे. तर यामुळे काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील यांच्या हातून मतदारांची दोरी सुटताना दिसत आहे.
मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुरेश खाडे आमदार असून त्यांनी मध्यंतरी आपण पाकिस्तानसारख्या मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आल्याचे खळबळजनक वक्तव्य केलं होते. यावरून जोरदार टीका झाली होती. यानंतर येथे नाराजी असेल असे दिसत होते. पण खाडे यांनी ठाकरे यांचे नेते तानाजी सातपुते यांच्या वर्चस्व कमी करत 315 बुथवर तब्बल 28 हजार 026 प्राथमिक सदस्य केली आहे. येथे 61 हजार 400 नोंदणी करण्याचे लक्ष पक्षाने दिले आहे.
शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्यजित देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपला चांगले दिवस आणले आहेत. येथे शरद पवार यांची राष्ट्रवादी सध्या मजबूत स्थितीत दिसत असून भाजपला 19 हजार 201 सदस्यांची नोंद करता आली आहे.
जत मतदारसंघात भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी भाजपच्या मजबुतीसाठी हातात कार्यक्रम घेतले आहे. त्यांनी येथे जवळपास 22 हजार सदस्यांची नोंदणी केली असून ते पक्षाने दिलेल्या लक्ष्याच्या 50 टक्के झाली आहे. पक्षाने जतसाठी 57 हजार 400 सदस्यांचे लक्ष ठेवले आहे.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे येथे भाजपच्या मनसुब्यांना ब्रेक लागला आहे. 58 हजार सदस्य नोंदणीचे टार्गेट असताना फक्त 12 हजार नोंदणी झाली आहे. पण जी नोंदणी झाली आहे. ती जयंत पाटील यांना विचार करायला भाग पाडणारी आहे.
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात दिवंगत आर आर पाटील यांना मानणारा मोठा मतदार आहे. पण येथे पाटील यांच्या विरोधकांनी विधानसभेवेळी एकजूट होत रोहित पाटील यांच्याविरोधात वातावरण तयार केले होते. त्याचा फायदा आता भाजपला होताना दिसत आहे. येथे भाजपने तब्बल 31 हजार 229 सदस्य नोंदणी केली आहे. जी रोहित पाटलांसाठी धोक्याची धंटा आहे.
खानापूर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सुहास बाबर आमदार आहेत. पण आता भाजपच्या सदस्य नोंदणीचा फटका यांना देखील बसताना दिसत आहे. येथे 21 हजार सदस्य नोंदणी झाली आहे.
पलूस कडेगाव विधानसभा काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचा बालेकिल्ला असून येथे देखील भाजपने सदस्य नोंदणीत सूर मारला आहे. भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांनी सदस्य नोंदणीत 21 हजार 458 जणांना पक्षात जोडून घेतले आहे. यामुळे काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या चिंतेत भर पडणारी ही माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.